नवनीत राणा यांच्यावर लोकसभा सभापतींनी कारवाई करावी, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची मागणी

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने देऊन बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी नवनीत यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा सभापतींनी नवनीत यांच्यावर कारवाई करून त्यांना लोकसभा सदस्य म्हणून देण्यात येणाऱ्या सुविधा रद्द कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केली.

राजधानीत पत्रकारांशी बोलताना अडसूळ यांनी आपली भूमिका मांडली. नवनीत राणा यांच्या बनावट जात प्रमाणपत्रावर मी सुरुवातीपासूनच आक्षेप घेऊन आवाज उठविला आहे. यापुढेही सर्वोच्च न्यायालयात  प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याचे अडसूळ यांनी सांगितले. खोटीनाटी प्रमाणपत्रे सादर करून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र, नवनीत कौर यांचा ढोंगीपणा नुकताच उघड झाला आहे. उच्च न्यायालयाने नवनीत कौर यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कालच दिला आहे. नवनीत राणा यांच्याप्रकरणी राष्ट्रपती, पंतप्रधान यांनाही पत्र पाठवणार असल्याचे सांगत यापुढेही आपली कायदेशीर लढाई सुरूच राहील, असे अडसूळ यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या