मुंबई विद्यापीठात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी

449

मुंबई विद्यापीठाचे शाहीर अमरशेख अध्यासन, लोककला अकादमी, मानव्यविद्या शाखा मुंबई विद्यापीठ आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 1 ऑगस्ट 2020 रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती आभासी पध्दतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी ‘संभाषण’ या ई- नियतकालिकेच्या अण्णा भाऊ साठे विशेषांकाचे प्रकाशन तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर आधारित वेबिनार चे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डाॅ. रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विनोद पाटील , मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. राजेश खरात आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे कार्यक्रम अधिकारी श्री सोडा उपस्थित होते. प्रा. डॉ मिलिंद आवाड यांनी अण्णा भाऊंचे बालपण ते साहित्य विश्वातील कामगिरीचा मागोवा आपल्या विवेचनातून मांडला.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विषयी विचार व्यक्त करताना डाॅ. बाबुराव गुरव म्हणाले की, “अण्णा भाऊ हे क्रांतीच्या धगधगत्या होम कुंडातून आलेलं कलेचे एक वेगळ भान आहे.” अण्णा भाऊं सोबत घडलेला सहवास आणि त्यातून आलेला अनुभव त्यांनी आपल्या विचारांतून मांडला. शाहीर संभाजी भगत यांनी ” दौलतीच्या राजा, उठून सर्जा, हाक दे शेजार्याला रं, शिवारी चला” हे अण्णा भाऊंचे गीत आपल्या बहारदार आवाजात सादर केले.

शाहीर अमरशेख अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ प्रकाश खांडगे आणि लोककला अकादमीचे विभागप्रमुख प्रा. डाॅ. गणेश चंदनशिवे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे निवेदन प्रा. डॉ नितीन आरेकर आणि प्रा. डॉ. मोनिका ठक्कर यांनी केले. तसेच संभाषण च्या अण्णा भाऊ साठे विशेषकांची माहिती प्रा. डॉ. शीतल पावसकर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या