लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तू बाबतसरकार क्वीन्स कौन्सिलमध्ये बाजू मांडणार

‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थीदशेत निवासस्थान असलेल्या लंडनमधील वास्तूचे स्मारकात रूपांतर करण्याबाबत तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने (क्वीन कौन्सिल) उपस्थित केलेल्या आक्षेपाबाबत राज्य सरकार योग्य बाजू मांडणार असल्याचा खुलासा सरकारने केला आहे. क्वीन कौन्सिलपुढे सरकारची बाजू मांडण्यासाठी तज्ञ समिती स्थापन केली आहे. या समितीत स्टिव्हन गॅस्टोविक्झ, नियोजनतज्ञ चार्ल्स रोझ यांचा समावेश आहे. यासंदर्भात सप्टेंबर महिन्यात सुनावणी होणार असून या सुनावणीच्या वेळेस महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण घेत असताना 1921-22 या काळात लंडन शहरातील 10, किंग हेन्री रोड, एनडब्ल्यू-3 येथे वास्तव्याला होते. महाराष्ट्र सरकारने ही वास्तू लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांच्या माध्यमातून विकत घेतली आहे. त्यांच्यामार्फत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि वास्तूच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र तेथील स्थानिक स्वराज्य संस्थेने निवासस्थानाचे रूपांतर स्मारकात करण्यास आक्षेप घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणात सरकार गंभीर असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेने उपस्थित केलेल्या आक्षेपांचे निराकरण करून हे स्मारक पूर्ण करण्यासाठी सर्व पातळय़ांवर प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय पातळीवरील संपूर्ण कार्यवाही प्रधान्याने पार पाडली जात असल्याचे सरकारने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या