विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा, लंडन न्यायालयाचे आदेश

53
बँकांना लुटून देशातून पळून गेलेल्या विजय मल्ल्याच्या खर्चाचा तपशील उघड झाला आहे

सामना ऑनलाईन । लंडन

हिंदुस्थानात सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये पळालेला लिकरकिंग विजय मल्ल्या याच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी हिंदुस्थानच्या ताब्यात देण्यास लंडनमधील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने आज मंजुरी दिली. हिंदुस्थानने दिलेल्या पुराव्यानुसार मल्ल्याविरुद्ध फसवणूक, कट रचणे आणि मनीलाँडरिंगचा खटला भरला जाऊ शकतो, असे न्यायमूर्ती एम्मा अर्बटनॉट यांनी सांगितले. त्यामुळे मल्ल्याला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेला 62 वर्षीय मल्ल्या हा 2016 मध्ये लंडनमध्ये फरारी झाला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच हिंदुस्थान सरकारने मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनला विनंती केली होती. एप्रिल 2017 मध्ये स्कॉटलंड यार्डने मल्ल्याला अटक केली होती. परंतु तो जामिनावर सुटला होता. त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रकरण 4 डिसेंबर 2017 पासून लंडनच्या न्यायालयात सुरू आहे. सीबीआयने वेस्टमिन्स्टर न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ऑगस्टा वेस्टलॅन्ड खटल्यातील आरोपी ख्रिश्चियन मिशेल याचे प्रत्यार्पण करण्यात हिंदुस्थान सरकारला काही दिवसांपूर्वीच यश मिळाले.

मल्ल्या म्हणतो…
आपल्याविरुद्धचा खटला हा राजकीय हेतूने प्रेरीत आहे. हिंदुस्थानात मला न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे. तिथे माझ्यावर आणखी आरोप लावले जाऊ शकतात.
आपण एक रुपयाही उधार घेतलेला नाही. किंगफिशर एअरलाइन्सने कर्ज घेतले होते. व्यवसायात नुकसान झाल्याने कर्जाची रक्कम खर्च झाली. मी फक्त गॅरेंटर होतो, फ्रॉड नाही.
कर्जाची 100 टक्के मुद्दल फेडण्यास मी तयार आहे. 2016 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयातही मी ही ऑफर दिली होती. माझ्यावर विनाकारण ‘बँकडिफॉल्टर’चा शिक्का लावला गेला आहे.
2016 मध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र पाठवून यासंदर्भात चौकशी समिती नेमण्याची मागणी केली होती. परंतु काहीच उत्तर मिळाले नाही.
हिंदुस्थानातील तुरुंगांची अवस्था चांगली नाही.

मल्ल्याला लवकरच हिंदुस्थानात आणू – सीबीआय
मल्ल्याविरुद्धचा खटला आता अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याला हिंदुस्थानात आणू असा विश्वास सीबीआयने व्यक्त केला आहे. मजबूत साक्षीपुराव्यांच्या आधारे आम्ही ब्रिटनच्या न्यायालयात आपली बाजू मांडली होती. मल्ल्याने बँकांचे कर्ज जाणीवपूर्वक फेडलेले नाही. मनीलाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये त्याला फरारी घोषित करण्यात आले आहे. ब्रिटिश कायद्यानुसारही तो आरोपी आहे, असे सीबीआयने म्हटले आहे.

कर्जबाजारीमुळे मार्च 2012 मध्ये मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सने युरोप आणि आशियातील आपली विमान उड्डाणे बंद केली. किंगफिशरची देशांतर्गत 340 विमान उड्डाणे होती. ती कमी करून 125 केली गेली. पण त्यामुळे काहीच फरक पडला नाही. ऑक्टोबर 2012 पासून किंगफिशरची सर्वच उड्डाणे बंद झाली. 2013-14 पर्यंत किंगफिशर एअरलाइन्सच्या घाटा वाढून 4301 कोटी रुपये झाला होता. मल्ल्याही श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकला गेला. कर्जाच्या मुद्दलीवरील व्याज वाढत गेले. 2016 पर्यंत ती रक्कम नऊ हजार कोटी रुपयांवर गेल्यानंतर मल्ल्या परदेशात पळून गेला.

परदेशात लपून बसलेले आरोपी
आरोपी                 प्रकरण             या देशात आश्रय
विजय मल्ल्या          कर्जबुडी             ब्रिटन
नीरव मोदी          पीएनबी घोटाळा       ब्रिटन
मेहुल चोक्सी        पीएनबी घोटाळा       ब्रिटन
संगीतकार नदीम   गुलशन कुमार हत्या    ब्रिटन
दाऊद इब्राहिम    मुंबई बॉम्बस्फोट        पाकिस्तान

जगातील फक्त 48 देशांबरोबरच प्रत्यार्पण करार
जगातील 48 देशांबरोबर हिंदुस्थानचा प्रत्यार्पण करार आहे. देशात आर्थिक घोटाळे करून त्या देशांमध्ये पळून गेलेल्या फक्त 5 आरोपींनाच 2014 पर्यंत हिंदुस्थानात परत आणण्यात यश मिळाले आहे. अद्याप 23 आरोपी परदेशामध्ये लपून बसले आहेत. त्यांना ताब्यात घेण्यासाठी संबंधित देशांकडे विनंतीही करण्यात आली आहे.

मल्ल्यासाठी आर्थर रोड जेल तयार
मुंबईवरील हल्ल्यातील पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अजमल कसाब याचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगातील ज्या दोन मजली इमारतीत होता त्याच इमारतीमध्ये आता कर्जबुडव्या विजय मल्ल्याचा मुक्काम असणार आहे. त्याच्यासाठी ‘हायसिक्युरिटी सेल’ तयार करण्यात आला आहे. ‘विजय मल्ल्यासाठी विशेष ‘हायसिक्युरिटी सेल’ तयार करण्यात आला आहे. त्याला इथे आणले गेले तर त्याच्या सुरक्षा आणि संरक्षणाची जबाबदारी आम्ही पार पाडू,’ असे आर्थर रोडमधील एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱयाने सांगितले. सुरक्षा आणि संरक्षणाबरोबरच वैद्यकीय सेवाही मल्ल्याला पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आर्थर रोड तुरुंगातील दोन मजली इमारतीमध्ये असलेल्या हाय सिक्युरिटी सेलमध्ये मल्ल्याला ठेवण्यात येईल. हा सेल इतर गुन्हेगारांच्या सेलपासून वेगळा आहे. मल्ल्याच्या सेलबाहेर 24 तास सीसीटीव्ही तसेच अत्याधुनिक शस्त्रधारी पोलीस तैनात असतील. आर्थर रोड तुरुंग हा देशातील सर्वोत्तम तुरुंग असल्याचे प्रमाणपत्र केंद्रीय गृहखात्याने दिले आहे. केंद्रीय पथकाने नुकताच आर्थर रोड तुरुंगामधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन त्याचे व्हिडीयो रेकार्डिंग ब्रिटनच्या न्यायालयात सादर केले होते.

पुढे काय…
ब्रिटन सरकार न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी असेल तर मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश कोणत्याही क्षणी काढू शकते, असे ब्रिटनमधील कायदेतज्ञ पावनी रेड्डी यांनी सांगितले. प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी मल्ल्याकडे 14 दिवस आहेत. त्याने अपील केले नाही तर 28 दिवसांत त्याचे प्रत्यार्पण होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या