पाकिस्तानने रोखला न्यूझीलंडचा विजयरथ

22

सामना ऑनलाईन। बर्मिंगहॅम

2017 साली अनपेक्षितपणे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱया पाकिस्तानने बुधवारी न्यूझीलंडचा वर्ल्ड कपमधला विजयरथ रोखून सेमी फायनलसाठीचे आपले आव्हान कायम राखले. बाबर आझमचे धडाकेबाज शतक, हारिस सोहेलचे दमदार अर्धशतक आणि शाहिन आफ्रिदीची प्रभावी गोलंदाजी पाकिस्तानच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. पाकिस्तानने तिसऱया विजयासह सात गुणांची कमाई केली असून न्यूझीलंडला स्पर्धेतील पहिल्याच पराभवाला सामोरे जावे लागले. बाबर आझमची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

शाहिन आफ्रिदीचा तडाखा

नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी घेतलेल्या न्यूझीलंडची अतिशय खराब सुरुवात झाली. प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने दुसऱयाच षटकात मार्टिन गप्टीलचे दांडके उडवून पाकिस्तानला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्यानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीने तडाख्याने न्यूझीलंडच्या फलंदाजीला भगदाड पडले. त्याने दुसरा आघाडीवीर कॉलिन मुन्रोसह (12) रॉस टेलर (3) व टॉम लॅथम (1) यांना स्थिरावण्यापूर्वीच बाद न्यूझीलंडची 3 बाद 38 अशी दुर्दशा केली, मात्र कर्णधार केन विल्यम्सनने सातत्यपूर्ण कामगिरी करताना 41 धावांची खेळी केली. शाबाद खानने त्याला यष्टीमागे सर्फराज खानकरवी झेलबाद करून न्यूझीलंडची अवस्था 5 बाद 83 कशी केविलवाणी केली. न्यूझीलंडचा डाव संकटात असताना जेम्स निशाम (नाबाद 97) व कॉलिन डी ग्रॅण्डहोम (64) यांनी संयमाने फलंदाजी करीत न्यूझीलंडचा डाव सावरण्याची जबाबदारी चोखपणे बजावली. या दोघांनी सहाव्या गडय़ासाठी 132 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करीत न्यूझीलंडला दोनशेच्या पल्याड नेले.

धावफलक
न्यूझीलंड – केन विल्यम्सन झे. सर्फराज गो. शादाब 41, जेम्स निशाम नाबाद 97, कॉलिन डी ग्रॅण्डहोम धावबाद (आमीर/सर्फराज) 64, मिचेल सँटनर नाबाद 5. अवांतर – 9, एकूण – 6 बाद 237 धावा. गोलंदाजी – शाहिन शाह आफ्रिदी 10-3-28-3, इमाद वसीम 3-0-17-0, शादाब खान 10-0-43-1.
पाकिस्तान – बाबर नाबाद 101, हाफिज झे. गप्टील गो. केन 32, सोहेल धावचीत 68. अवांतर – 7, एकूण-ः 49.1 षटकांत 4 बाद 241 धावा. गोलंदाजी -बोल्ट 10-0-48-1.

बाबर आझम व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील हीरो हारिस सोहेल यांनी चौथ्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी करीत सामन्याला कलाटणी दिली. हारिस सोहेलने दोन षटकार व पाच चौकारांसह 68 धावा केल्या. तो धावचीत झाला. बाबर आझमने 11 चौकारांसह नाबाद 101 धावा करीत पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले

आपली प्रतिक्रिया द्या