पाकिस्तानी क्रिकेट शौकीन करताहेत टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना

सामना ऑनलाईन। बर्मिंगहॅम

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील 32 लढती आतापर्यंत पूर्ण झाल्या असून मंगळवारी ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडला पराभूत करीत सर्वांआधी उपांत्यफेरीत धडक मारली. आता उर्वरित 3 जागांसाठी हिंदुस्थान, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि पाकिस्तान या 5 संघांत चुरस आहे. यापैकी आतापर्यंत एकही पराभव न स्वीकारलेले हिंदुस्थान आणि न्यूझीलंड यांचे उपांत्यफेरी प्रवेश सुकर मानले जात आहेत. पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेश या संघांचे भवितव्य मात्र अद्याप जर तरच्या स्थितीत आहे. त्यामुळे टीम इंडिया यापुढच्या सर्व 4 लढती जिंकावी यासाठी पाकिस्तानी चाहते दुवा करणार आहेत. कारण पाकिस्तान पुढच्या तिन्ही लढती जिंकल्यास त्यांना उपांत्यफेरी प्रवेशाची आशा अद्याप जिवंत आहे.

… तर वर्ल्डकपमध्ये पुन्हा हिंदुस्थान-पाकिस्तान सामना शक्य

हिंदुस्थान सर्व लढती जिंकल्यास यजमान इंग्लड आणि बांगलादेशचे आव्हान संपुष्टात येईल आणि पाकिस्तानला चौथे स्थान मिळवण्याची आशा धरता येईल असे पाकिस्तानी क्रिकेट शौकिनांचे गणित आहे. त्यामुळे आता पाकिस्तानी चाहते हिंदुस्थानच्या यापुढच्या सर्व लढतीत हिंदुस्थानी विजयासाठी पाठिंबा देणार आहेत. हिंदुस्थानला आता वेस्ट इंडिज, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे. यातील एका लढतीत जरी टीम इंडियाने पराभव पत्करला तर पाकिस्तानचे उपांत्यफेरी गाठण्याचे गणित पार बिघडणार आहे. त्यामुळे यंदा प्रथमच हिंदुस्थानद्वेष बासनात गुंडाळून पाकिस्तानी समर्थक हिंदुस्थानी संघाच्या विजयाची प्रार्थना करीत आहेत.