कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस

22

सामना ऑनलाईन । चेन्नई

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरमविरोधात सीबीआय आणि ईडीने लूक आऊट नोटीस जारी केली आहे. गैरव्यवहाराने कार्ती यांनी आयएनएक्स मीडियाला फायदा करून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआय आणि ईडीने त्यांना हजर होण्यासाठी अनेकदा समन्स बजावले, मात्र ते एकदाही आले नाहीत. त्यामुळे अखेर त्यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली. ही नोटीस रद्द करण्यासाठी कार्ती यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर ७ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा वापर करत कार्ती यांनी आयएनएक्स मीडियाला परदेशी निधी थेट हस्तांतरित करण्यासाठी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कार्ती यांच्याशी संबंधित कंपनीला पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया कंपनीकडून काही रक्कम वळवण्यात आली होती. या प्रकरणी कार्ती चिदंबरम आणि आयएनएक्स मीडियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माझा संबंध नाही
कार्ती यांनी शुक्रवारी शिवगंगा येथील आपल्या घराचे फोटो ट्विट केले. त्यात ते काहीजणांशी चर्चा करताना दिसत आहेत. जे माझा शोध घेत आहेत. हे फोटो त्यांच्यासाठी आहेत असे त्यांनी म्हटले होते. आयएनएक्स मीडियाशी आपला काहीही संबंध नाही. तसेच मंत्रालयाच्या कोणत्याही कामात आपण हस्तक्षेप केलेला नाही असे कार्ती यांनी म्हटले होते. सूडाच्या भावनेतून केंद्र सरकार हे करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या