आनंदाची लयलूट

122

<< भटकेगिरी >> द्वारकानाथ संझगिरी

आधुनिक फिरस्ता हा शॉपिंगवर प्रेम करतोच करतो. माझं विण्डो शॉपिंग जास्त असतं. देशात किंवा परदेशात झगमगत्या काचेआत डोकावल्याशिवाय मला चैन पडत नाही. लहानपणी माथेरानला गेलो तेव्हा रंगवलेलं वाळलेले गवत फ्लॉवरपॉटमध्ये ठेवायला घेऊन आलो होतो. घरात फ्लॉवरपॉटही नव्हता. पण लेकराने गवत आणलं म्हणून आईने फ्लॉवरपॉटचा उद्योग केला. पुढे पुढे तो फ्लॉवरपॉट एकटाच कुणाच्या कंपनीशिवाय उभा रहायचा. दोन खोल्यांच्या घरात फ्लॉवरपॉट ही चैन होती.

त्याला जागा करून देणे आणि खबरदारी घेणे ही त्याहून मोठी चैन! एके दिवशी जबरदस्तीने आमच्या घरी राहायला आलेल्या एका उंदराच्या लाथेने तो पॉट कलंडला, पडला आणि मृत्युमुखी पडला. त्यानंतर आम्ही दोन अश्रू ढाळले. पुन्हा आईने मला समजावले, ‘‘मोठं घर घेतलं की नवा घेऊ.’’ पुन्हा घरात फ्लॉवरपॉट फक्त भेटवस्तू म्हणून आला आणि सुरुवातीच्या फुलांच्या सहवासानंतर पुढे त्याला विधुराचं एकटेपणच जाणवलं.

लहानपणी काही वेळा बाहेर गेल्यावर उगाचच काहीतरी आईवडिलांसाठी घेऊन यावंसं वाटायचं. शाळेत असताना मी ट्रिपला माऊंट अबूला गेलो होतो. बिनडोक मी आहेच, त्यात वय लहान! मी खाऊला दिलेले पैसे वाचवले. इतर मुलं आईस्क्रीम खायची तेव्हा मी लॉलीपॉप खायचो. अबूला मी वडिलांसाठी कातड्याचे फर असलेले हॅण्डग्लोव्हज् आणि आईसाठी फरची पर्स घेतली. मुंबईत त्याकाळी काय, आजही फर असलेले ग्लोव्हज् वापरावेत अशी थंडी कधी पडते? पण माझ्या वडिलांनी त्यांना मुलाने प्रेमाने ग्लोव्हज् आणले म्हणून न चिडता ते ग्लोव्हज् जपले. वापरायची संधी त्यांना कधी मिळालीच नाही. आयुष्यात एखादवेळी महाबळेश्वर सोडलं, त्यापेक्षा थंड हवेचा संबंध त्यांचा कधी आलाच नाही. पण पुढे इंजिनीअरिंगला असताना मी उत्तर हिंदुस्थानात स्टडी टूरला निघालो आणि वडिलांनी ते ग्लोव्हज् मला काढून दिले. टचकन माझ्या डोळ्यात पाणी आलं. एरवी आईपेक्षा खूप कडक वाटणारे वडील त्यावेळी इतके मृदू वाटले की, कापसालाही त्यांच्याकडून मृदूपणा घ्यावासा वाटला असता. बरं, आई ती फरची पर्स १९६५ च्या काळात कुठे वापरणार? ती येऊन-जाऊन जाणार मार्केटमध्ये! तिथे कोळणीबरोबर पापलेट आणि बोंबलाचे भाव करताना ती पर्स वापरणार की भय्याला थोडी कोथिंबीर आणि कडीपत्ता जास्त टाक सांगताना फरच्या पर्समधून नाणी काढून देणार? त्या काळी नाण्यांनाही किंमत होती. शंभराची नोट हे श्रीमंतीचं लक्षण होतं. मी त्या नोटेकडेही अनेकदा अनिमिष नजरेने पाहिलंय. आता तर दोन हजारांची नोट डोक्याला ताप वाटते. कधीतरी घरच्या लग्नात ती पर्स तिने मिरवली. मुलाने अबूहून आणली म्हणून आवर्जून सांगितलं. ती अशी जपली होती तिने की मला वाटलं, दागिन्यांबरोबर ती सुनेकडे येणार. ती नाही आली. कदाचित तिला वाटलं असेल की, सुनेला ती आऊटडेटेड वाटली तर… पण शेवटपर्यंत ती पर्स तिच्या कपाटात कोपऱ्यात दिसायची. एक गोष्ट मी त्यातून नकळतपणे शिकलो की, आपल्याला सुंदर आणि हवीहवीशी वाटणारी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी उपयुक्त असतेच असं नाही. त्यामुळे मनात असूनही मी श्रीदेवीला लग्नाचं प्रपोजल दिलं नाही. त्याचा फायदा बोनी कपूरने उचलला असं म्हणतात. दुसरी एक गोष्टही मी शिकलो. कुणी प्रेमाने दिलेली वस्तू आपल्याला आवडली नाही तरी तिचा सन्मान करायचा.

त्यामुळे पुढे परदेशातून कुणासाठी गिफ्ट आणतानाही मी विचार करायला लागलो आणि स्वतःसाठी खरेदी करताना तर मी इतका फिरतो की बायको कंटाळते आणि एखादी गोष्ट मला आवडली आणि मी घेतली की बायको ‘युरेका युरेका’ असं आर्किमिडीजप्रमाणे ओरडते. शॉपिंगला गेलो म्हणजे विकत घेतलंच पाहिजे या मताचा मी नाही. मला एकदा चकचकीत पॉलिशचे टॅक्सडो शूज (बूट) हवे होते. अमेरिकेत मनासारखे मिळाले नाहीत. इंग्लंडमध्ये अनेक दुकानं फिरलो. मन एखाद्या बुटावर बसलं की, खिसा नकार द्यायचा. खिशाने होकार दिला की, मनाला पसंत पडायचे नाहीत. शेवटी एका बुटाचं नशीब फळफळलं आणि संझगिरींच्या ऐतिहासिक बुटांच्या शेल्फमध्ये त्यांना जागा मिळाली. परवा असंच एका ‘मेड इन व्हिएतनाम’ बुटाचं हिंदुस्थानमध्ये स्थलांतर हुकलं. अॅडलेडमध्ये एकदा रॅण्डॉल मॉलवर फिरत असताना एका दुकानातले बूट पाहून मी वेडावलो. प्रेमनाथने ‘जॉनी मेरा नाम’मध्ये नाचणाऱ्या पद्मा खन्नाकडे पाहावं तसा मी बुटाकडे पाहत बसलो… मी आत शिरलो. माणूस चिनी वंशाचा वाटला. तो व्हिएतनामी निघाला. अमेरिकेविरुद्धच्या व्हिएतनामी युद्धानंतर ऑस्ट्रेलियात बरेच व्हिएतनामी आश्रित म्हणून आले. ते मोठे झाले. मी त्या बुटांची किंमत विचारली. त्याने मला सांगितली, ‘‘सोळाशे डॉलर्स.’’ टिपिकल हिंदुस्थानी नागरिकाप्रमाणे ऑस्ट्रेलियन डॉलरच्या हिंदुस्थानी रुपयातल्या रेटने त्याला गुणलं. उत्तर आलं, ‘‘त्र्याऐंशी हजार दोनशे’’.. खिशाने पटवलं, ‘‘आपलं आडनाव अंबानी, अदानी, मफतलाल, टाटा, बिर्ला, बच्चन, तेंडुलकर, कोहली नाही. आपण अगदी विरोधी पक्षातही नेतेपदी नाही. गेलाबाजार नगरसेवकही नाही. हे बूट त्यांच्या घरात नांदण्यासाठी जन्माला आलेले आहेत. सबब, पडलेला चेहरा उचल आणि चल बाहेर.’’ ‘इतकं काय मोठ्ठं खानदान आहे बुटांचं?’ हे जाणून घ्यावं म्हणून मी त्या मालकाला त्याची स्पेशालिटी विचारली. त्याने सांगितलं, कसं हॅण्डक्रॉफ्टिंग केलंय, चामड्याची जात वगैरे सांगितली आणि नाक वर करून सांगितलं, हा ‘डिझायनर्स आयटेम’ आहे.’ जगात एकच! मी म्हटले ‘‘अस्सल इटालियन मेक दिसतोय.’’ त्याने चेहरा संजय निरुपमला पाहून गुरुदास कामतने करावा किंवा व्हाईस व्हर्सा तसा केला. छाती छप्पन इंची केली आणि वदला, ‘‘त्यापेक्षा जास्त चांगले आहेत.’’

त्यापेक्षा चांगले? स्वर्गातल्या फॅक्टरीतले बूट ऑस्ट्रेलियात आणायची सोय झालीय की काय? मी स्वतःलाच विचारलं तेव्हा तो म्हणाला, ‘‘ते व्हिएतनामी आहेत. माझी  तिथे फॅक्टरी आहे. तिथून ते येतात.’’

माझ्या लहानपणी बूट जेव्हा विकत घेतले जायचे तेव्हा वडील पहिला प्रश्न विचारायचे, ‘‘किती टिकतील?’’ त्याने पाच वर्षे सांगितलं की, वडील खूश! ते बूट घेऊन घरी आल्यावर मी मंदबुद्धी मुलगा वडिलांना सांगायचो, ‘‘पपा, वर्षभरात माझा पाय वाढणार, पाच वर्षे टिकणारे बूट घेऊन काय करायचं? त्यापेक्षा स्टायलिश वर्षभर टिकणारे बरे.’’ चिनी स्टाईल मालाचा मी पहिला हिंदुस्थानी प्रवक्ता आहे. पण मला क्रेडिट मिळत नाही. तर त्या व्हिएतनामी बूटवाल्यालाही आमचा परंपरागत प्रश्न विचारला, ‘‘किती टिकतील?’’

त्याने माझ्याकडे पाहिलं आणि गोल्ड मेडल मिळवलेल्या अॅथलिटसारखा चेहरा करून म्हटलं, ‘‘टू लाईफ्स दोन आयुष्यं! धिस इज मेड इन व्हिएटनाम’’ ऑस्ट्रेलियन नागरिकत्व  असलेला माणूस स्वतःच्या देशाचा कडवा अभिमान दाखवत होता. साध्या केसाच्या फणीबद्धल मी ‘धिस इज मेड इन इंडिया अॅंण्ड कॅन लास्ट फॉर लाईफ’’ असं उद्या अभिमानाने म्हणू शकलो तर मला बरं वाटेल.

कधी येईल तो दिवस?

[email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या