विमानापेक्षा ट्रेनचे तिकीट महाग! रेल्वेच्या प्रीमियम तत्काळ सिस्टममुळे ग्राहकांची लूट

गेल्या 10 वर्षांत रेल्वेच्या तिकिटात भरमसाठ वाढ झाली आहे. रेल्वे प्लॅटफॉम तिकिटापासून ते एसी कोचपर्यंत सर्वच महाग करण्यात आले आहे. बंगळुरू ते कोलकाता यादरम्यान धावणाऱ्या हावडा एक्स्प्रेसच्या तिकिटाची किंमत दहा हजार रुपये झाली आहे. इतके महाग तिकीट झाल्यामुळे अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. हिंदुस्थानी रेल्वेने डायनामिक प्रायसिंग सिस्टम लागू केली. यामुळे डिमांडनुसार, तिकिटाच्या किमतीत वाढ होत आहे. परंतु तिकिटाच्या किमतीत चार पट वाढ होईल असे वाटले नव्हते.

एसएमवीबी हावडा एक्स्प्रेसचे तिकीट 2900 रुपयांना मिळते. परंतु हेच तिकीट प्रीमियम तत्काळ सिस्टमअंतर्गत 10,100 रुपयांना विकले जात आहे. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून एका प्रवाशाने याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. बंगळुरू ते कोलकाता विमानाचे तिकीट 4500 रुपये आहे, तर रेल्वेच्या प्रीमियम तत्काळमध्ये रेल्वेचे तिकीट दहा हजारांपेक्षा जास्त आहे. ट्रेनने 29 तास लागतात, तर फ्लाईटने केवळ 2.40 तास लागतात. त्यामुळे रेल्वेऐवजी विमान प्रवास स्वस्त आहे, असे एका युजरने सोशल मीडियावर लिहिले आहे.

फुकट प्रवास करा अन् दंड भरा

एका युजरने प्रीमियम तत्काळ सिस्टमवर संताप व्यक्त केला आहे. प्रीमियम तत्काळ तिकीट खरेदी करून प्रवास करण्याऐवजी विनातिकीट प्रवास केलेला बरा. कारण टीसीने पकडल्यानंतर 250 ते एक हजार रुपये दंड भरावा लागू शकतो. दहा हजार रुपये देण्यापेक्षा एक हजार रुपये देणे केव्हाही चांगले, असे या प्रवाशाने म्हटले आहे.
2900 रुपयांचे तिकीट 10,100 हजारांना हावडा एक्स्प्रेसच्या 2-एसी तिकिटाची किंमत 2900 रुपये आहे. परंतु तिकिटाची मागणी वाढल्यामुळे हे तिकीट 10,100 रुपयांना विकले जात आहे. प्रीमियम तत्काळ सिस्टम आयआरसीटीसीने लागू केली होती. याला तत्काळ तिकीट व्यवस्थेहून वेगळे ठेवले आहे. तत्काळ सिस्टममध्ये तिकिटाची किंमत कायम राहते. परंतु प्रीमियम तत्काळमध्ये किंमत डिमांडनुसार वाढते. ही प्रवाशांची लूट आहे, असेही काही प्रवाशांनी म्हटले आहे.