लोटे औद्योगिक वसाहत पुन्हा एकदा स्फोटाने हादरली

खेड– लोटे औद्योगिक वसाहतीतील आणखी एका कारखान्यात रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला. मात्र प्लॉन्टमध्ये काम करणार्‍या कामगारांचे दैव बलवत्तर म्हणून हे कामगार बचावले. ही घटना रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. गेल्या सहा महिन्यांत लोटे औद्योगिक वसाहतीतील ही पाचवी दुर्घटना असल्याने या वसाहतीत काम करणार्‍या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोटे औद्योगिक वसाहतीतील केसट पेट्रो या रासायनिक कारखान्याच्या युनिट २ मध्ये रात्रपाळीचे १२ कामगार काम करत होते. यावेळी रिअ‍ॅक्टरमध्ये वाफेचे प्रेशर अचानक वाढले आणि रिअ‍ॅक्टरवर बसवलेले स्टिम जॅकेट उडाले. यावेळी झालेल्या जोरदार धमाक्याने प्लॅन्टमध्ये काम करणारे कामगार कमालीचे घाबरून गेले.
खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या रिअ‍ॅक्टरचा स्टिम जॅकेट उडाला तो रिअ‍ॅक्टर अतिशय जुना रिअ‍ॅक्टर आहे. या रिअ‍ॅक्टरच्या स्टिम जॅकेटला रिअ‍ॅक्टरमध्ये निर्माण झालेला हवेचा दाब सहन न झाल्याने स्टिम जॅकेट फुटला आणि कानठळ्या बसवणारा आवाज झाला. ही दुर्घटना घडताच कामगारांनी प्रसंगावधान राखून प्लॅन्टबाहेर जाण्याचा निर्णय घेतल्याने मनुष्यहानी टळली.

गेल्या सहा महिन्यात लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांमध्ये घडलेले ही पाचवी दुर्घटना आहे. २७ जून रोजी या वसाहतीतील घरडा केमिकल्स या कारखान्यात आग लागली होती. या आगीत मन्युष्यहानी झाली नसली तरी आगीच्या झळा अनेकांना बसल्या होत्या. त्यानंतर ६ जुलै रोजी येथील इंडियन ऑक्सालिट या कारखान्यातून उग्र वासाची वायुगळती झाली होती. ही घटना ताजी असतानाच २८ जुलै रोजी पुन्हा घरडा केमिकल्स या कारखान्यात रिअ‍ॅक्टरचे झाकण उडाल्याने स्फोटसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

१५ ऑक्टोबर २०१६ रोजी या वसाहतीत आणखी एका रिअ‍ॅक्टरचा धमाका उडाला. येथील नंदादीप या रासायनिक कारखान्यात रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन महेंद्र शिवाजी शिवाजी शिंदे (२८) या कामगारांचा बळी गेला होता. २५ ऑक्टोबर च्या रात्री पुन्हा याच औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया केमिकल्स या कारखान्यात रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन जखमी झालेल्या ५ कामगारांपैकी दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.

गेल्या सहा महिन्यात लोटे औद्योगिक वसाहतीत झालेल्या सहा वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तीन कामगारांचा बळी तर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये काम करणार्‍या कामगारांची सुरक्षितता पूर्णपणे धोक्यात आली आहे.