कोणाचं नशीब कधी फळफळेल हे सांगता येत नाही. आयुष्याची 67 वर्षे कष्ट करण्यात घातल्यानंतर पंजाबमधील एका वयोवृद्ध व्यक्तीला तब्बल अडीच कोटी रुपयांची लॉटरी लागली. भंगार विक्रीचे काम करणाऱ्या 67 वर्षीय प्रीतम लाल जग्गी यांनी आपल्या बायकोच्या नावाने लॉटरी तिकीट खरेदी केले होते. या तिकिटाची किंमत 500 रुपये होती. कधीतरी आपले नशीब उजळेल या उद्देशाने प्रीतम सिंग हे गेल्या 50 वर्षांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत होते. परंतु अखेर त्यांना 2.5 कोटी रुपयांच्या किमतीची लॉटरी लागली.
लॉटरी लागल्यानंतर सुरुवातीला त्यांचा यावर विश्वासच बसेना. काही वेळाने त्यांना लॉटरी विकणाऱ्या एजन्सीचा फोन आला तेव्हा त्यांनी त्यावर विश्वास ठेवला. प्रीतम हे पंजाबमधील जालंधर जिह्यातील आदमपूर शहरात भंगार विकण्याचे काम करतात. गेल्या आठवड्यात त्यांनी शहरातील सेवक नावाच्या व्यक्तीकडून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. हे तिकीट त्यांनी स्वतःच्या नावाने नाही तर पत्नी अनिताच्या नावाने खरेदी केले होते.