नशीब असावे तर असे… आधी लागली लॉटरी, नंतर मिळाला खजिना!

3838

कधी, कसे, कुठे, कोणाचे नशीब फळफळेल याबाबत काहीच सांगता येत नाही. नशीबामुळे एका क्षणात रंकाचा राजा होतो, तर राजाचा रंक होतो. काहीजणांचे नशीब ‘छप्पर फाड के’ धनवर्षाव करते, असाच अनुभव तिरुवंनतपूरममधील बी. रत्नाकरन पिल्लई यांना आला आहे. जानेवारी महिन्यात त्यांना 6 कोटींची लॉटरी लागली. शेती करण्याच्या हेतून त्यांनी त्या रकमेतून शेतजमीन खरेदी केली. पेरणी करण्यासाठी शेतात नांगरणी सुरू असताना त्यांना मोठा खजिना सापडला आहे. त्यामुळे नशीब असावे तर असे असे गावकरी म्हणत आहेत.

या वर्षात नशीब मेहरबान झाल्याचा अनुभव 66 वर्षांच्या पिल्लई यांना आला. वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात त्यांना 6 कोटींची लॉटरी लागली. त्यामुळे ते मालामाल झाले. उर्वरीत आयुष्यात शेती करावी, या विचाराने त्यांनी मिळालेल्या काही पैशांतून शेतजमीन खरेदी केली. त्यांनी जी जमीन खरेदी केली होती. त्यात शेतीसाठी नांगरणी सुरू असताना त्यांना मोठ्या प्रमाणात खजिना सापडला आहे. त्यात विविध प्रकारची तांब्याची नाणी आणि काही मुद्रा आहेत. विकत घेतलेल्या शेतात पेरणी करण्यासाठी नांगरणी आणि खोदकाम सुरू असताना खोदताना आवाज झाला. त्यामुळे जमीनीत काहीतरी असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी आणखी खोदकाम केले. त्यावेळी त्यांना तांब्याची मोठी पेटी आढळली. त्यात तांब्याची हजारो प्राचीन नाणी होती. प्राचीन त्रावणकोर साम्राज्याची ही नाणी असल्याची माहिती मिळाली आहे. त्याकाळी काही कारणाने या शेतात ते धन लपवण्यात आले होते. ही जागा प्राचीन कृष्णमंदिराजवळ आहे. ते मंदिर थिरुपलकदल श्री कृष्ण स्वामी क्षेत्र नावाने प्रसिद्ध आहे.

या नाण्यांची मोजणी करण्यात आली असता त्यांचे वजन 20 किलो 400 ग्रॅम असल्याचे उघड झाले. तर एकूण 2,595 नाणी आहेत. अनेक वर्षे जमीनीखाली राहिल्यानंतरही नाण्यांची ओळख स्पष्टपणे दिसत आहे. त्रावणकोरच्या साम्राज्यातील दोन महाराजांच्या काळातील ही नाणी आहेत. राजा श्री मूलम थिरुनल राम वर्मा आणि चिथुरा थिरुनल बाला राम वर्मा या राजांच्या काळातील ही नाणी आहेत. ही नाणी आपण राज्य सरकारकडे सोपवणार असल्याचे पिल्लई यांनी सांगितले. या प्राचीन नाण्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये पिल्लई यांच्या नावाची चर्चा आहे, नशीब असावे तर असे सर्वजण म्हणत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या