प्रेमप्रकरणातून भाजप नेत्याच्या मुलाची हत्या, मित्रांनीच केलं कारस्थान

प्रातिनिधिक फोटो

उत्तर प्रदेशात एका भाजप नेत्याच्या मुलाची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात घडली आहे. येथील भाजपचे बुथ अध्यक्ष हीरालाल यांचा मुलगा राणा प्रताप बेलदार याचा मृतदेह 16 ऑक्टोबर रोजी सोनबरसा जंगलात सापडला होता. काही अज्ञातांनी त्याच्या डोक्यावर दांडुक्यांनी प्रहार करून त्याला जिवे मारलं होतं. त्याची हत्या अपघात वाटावी म्हणून त्याच्या अंगावर बाईकही आडवी टाकण्यात आली होती.

पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या तपासात राकेश यादव, रामकेश यादव आणि पन्ने लाल या तिघांवर पोलिसांना संशय आला. त्यांनी या तिघांची कसून चौकशी केली. त्यात या तिघांनी आपला गुन्हा कबूल केला. राणा प्रताप याला मारण्याचं कारणही त्यातून स्पष्ट झालं.

राणा, राकेश, रामकेश आणि पन्नेलाल हे चौघेही मित्र होते. रामकेश या आरोपीचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्याच महिलेसोबत राणा प्रताप याचेही प्रेमसंबंध होते. राणा संबंधित महिलेला गुपचूप भेटत असे. या संबंधाबाबत माहिती मिळाल्यानंतर रामकेश याने वारंवार राणाला महिलेला भेटू नकोस, असं सांगितलं होतं. मात्र, राणाने त्याला जुमानलं नाही. तो महिलेला भेटत राहिला. त्यामुळे रामकेश याने राकेश आणि पन्नेलालच्या मदतीने राणा प्रताप याला सोनबरसा जंगलात बोलवलं आणि त्याच्या डोक्यावर दांडुक्याने प्रहार करून त्याची हत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या