ऑफिसमधली ‘गुटर…गू’ कशी सांभाळाल?

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रेमाला आखीव राखीव अशी काही मर्यादा नसते. प्रेम कधीही, केव्हाही आणि कुठेही कोणालाही कोणावरही होऊ शकतं. हे कितीही खरं असलं तरी जेव्हा ऑफिसमधल्या मित्र/मैत्रीणीबरोबर ते सुरू होते, तेव्हा प्रेम कमी आणि राडेच वाढतात, असं नुकतच एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. कारण तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिचं इतरांशी हसून खेळून बोलणं तुमच्या मनाला रुचेल असं नाही. तिच्या कामात कुणी चुका काढलेलं, तिला घालून पाडून बोललेलं तुम्हाला सहन होईल असं नाही. तुमच्या नजरेतलं प्रेम इच्छा असूनही तुम्ही सर्वांसमोर व्यक्त करु शकणार नाही. उगाच हासे होण्याची भीती, याशिवाय कामापेक्षा तिच्याकडेच जास्त लक्ष जात असल्याने कामाची बोंब होईल ती वेगळीच. पण जर हे प्रकरण स्मार्ट व मॅच्युअरपणे हाताळले तर प्रेमासारख दुसरं वेड नाही.

सर्वेक्षणानुसार, सध्याच्या धावपळीच्या काळात आपला बराचसा वेळ हा घरापेक्षा ऑफिसमध्येच जास्त जातो. यामुळे आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपली नकळत जवळीक वाढते. आचार-विचारांची देवाण-घेवाण होते आणि त्यातून समोरच्याचा स्वभाव कळतो. या सगळ्यामुळे ऑफिसमध्येच काही जणांना बेस्ट फ्रेंड्स मिळतात. तर काही जणांना आयुष्याचा साथीदार मिळतो. सध्यस्थितीत जवळजवळ ८५ टक्के प्रकरण ही ऑफिसमध्येच जुळतात. पण त्याचा कामावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि यासाठी काय कराल?

हे करा
– प्रेम ही खूप नाजूक भावना आहे. यामुळे ते जितकं गुपीत ठेवाल तेवढी त्याची मजा वाढेल.
– प्रत्येक नात्यात एक स्पेस हवीच हे लक्षात ठेवा. ऑफिसमध्ये असताना कामाला प्राधान्य द्या.
– तुमच्यातले वाद ,सर्वांसमोर मांडू नका. सामंजस्याने ते सोडवा, नाहीतर हसे होईल.
– ऑफिसमध्ये असताना तुम्ही तेथे नोकरी करत आहात हे विसरू नका. तुमच्या वागण्यावरच तुमचे भविष्य घडते.
– ऑफिसमध्ये खासगी वाद उकरुन काढू नका.
– प्रेमाचे प्रदर्शन करू नका, नाहीतर मान सन्मान गमवाल.
– जमले तर दोघांपैकी एकाने दुसऱ्या कंपनीत नोकरी शोधावी. यामुळे दोघांना एकमेकांसाठी वेळ देता येईल.