प्रेम + थंडी = गुलाबी थंडी

<< डॉ. मेधा ताडपत्रीकर >>

थंडी हवाएं लहाराके आए, रुत है जवां, तुमको यहां कैसे बुलाए, असे गात असलेली हिरोईन पहाताना आपल्यालाही प्रियकराची आठवण येणे सहाजिकच आहे. थंडीचा ऋतू आपल्या गारठयासोबत प्रेमिकांसाठीही रोमान्स घेऊन येत असतो. जगभरात सगळीकडेच हिवाळ्याला रोमँटिक समजले जाते. बाहेर पांढया शुभ्र बर्फाची चादर, हातात ग्लोव्हज, समोर लाकडाची उब देणारी शेकोटी आणि जवळ तुमचा जिवलग. आता थंडीलादेखील गुलाबी थंडी म्हणतात आणि गुलाबी हा रंग प्रेमाचा आहे.

गेल्याच महिन्यात श्रुती मराठे आणि मृण्मयी देशपांडे ह्या मराठी चित्रपटसृष्टीतील दोन नायिकांचे शुभमंगल झाले आहे. हिवाळ्यात झालेले लग्न आणि लग्ना नंतरचे नव्या नवलाईचे दिवस यामुळे दोघींच्या आयुष्यात रोमान्स महत्त्वाचा आहे. या विंटर रोमान्स बद्दल त्या दोघींना काय वाटत म्हणून त्यांच्याशी संवाद साधला.

मृण्मयी देशपांडे ही अजून एका गुणी अभिनेत्री. ‘नटसम्राट’, ‘कटय़ार काळजात घुसली’ मधून प्रेक्षकांना भेटलेल्या मृण्मयीचं लग्न व्यावसायिक असलेल्या स्वप्नील राव याच्यासोबत गेल्याचा महिन्यात झाले आहे. एका आघाडीची अभिनेत्रीने ऍरेंज लग्न कसं केलं हे सांगताना मृण्मयी म्हणाली, खरं तर आम्ही दोघांनी असं लग्न केलं असतं का नाही माहिती नाही, पण आम्हाला एकत्र आणणारा दुवा आहे. कारण आम्ही एकमेकांना पाहिले आणि आम्ही प्रेमात पडलो. आणि त्यामुळेच लग्न करण्याचा निर्णयदेखील घेतला. त्यामुळे तसे पाहिलं तर आम्हाचे टिपिकल अरेंज मेरेज नाही. पुण्यात जन्मलेल्या मृण्मयीचा हिवाळा हा आवडता ऋतू आहे. त्यामुळे तिला पुण्याच्या थंडीची आठवण मुंबईत होत असते. थंडीत स्वेटर वापरता येतो आणि मुख्य म्हणजे सकाळी अंथरुणात लोळत हक्काने उशिरा उठता येते. अंगावर लपेटलेल्या दुलईत उब घेत झोपण्यातली मजा केवळ थंडीतच मिळते. मृण्मयीने हनिमून साठी न्यूझीलंडची निवड केली होती. तेव्हा तिकडचा उन्हाळा असला तरीही तिच्यासाठी तिथे हिवाळा वाटावा इतकी थंडी होती. हिंदुस्थानात परतल्यावर मात्र दोघांच्याही कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांची भेट होणे जरा अवघड झाले आहे. त्यामुळे या थंडीत तिला स्वप्नीलचा विरह सहन करावा लागतो आहे.

तुमच्याही आयुष्यात कोणी स्पेशल असेल तर या मोसमात रोमान्स कारायला विसरू नका. सकाळी लवकर जोडीदाराला बरोबर घेऊन फिरायला जा आणि नंतर गरमागरम चहासोबत थंडीची मजा लुटायला विसरू नका.

श्रृतीचा थंडी हा सगळ्यात आवडता ऋतू आहे. थंडीत सकाळी पडणारे धुके त्यातून डोकावणारी उन्हाची एखादी तिरीप हे खूप भावते. मुंबईमध्ये फारशी थंडी नसल्याने ती पुण्याची थंडी नक्कीच मिस करते. लग्नानंतर हनिमूनला मात्र तिने बाली या ठिकाणाची निवड केली होती. तिच्या मते जेव्हा ती आणि तिचा नवरा एकत्र असतात तो प्रत्येक क्षणच रोमँटिक असतो. श्रृती आणि तिचा नवरा गौरव घाटणेकर यांचा प्रेमविवाह आहे. श्रृती आणि गौरवची ओळख `तुझी माझी लव्ह स्टोरी’ या सिनेमादरम्यान झाली. तीन वर्षा नंतर दोघांनी लग्न केले. लग्नानंतर श्रृतीला खूप छान वाटतंय. कारण एकमेकांची ओळख असली तरीही एकत्र राहताना आणि नवऱयाला समजून घेतानाचा हा काळ तिला खूप आवडतो आहे. श्रृतीच्या मते लग्न झाल्यापासून तिच्या नवऱयाचा सपोर्ट चोवीस तास मिळायला लागला आहे आणि ही तिच्या मते चांगली गोष्ट आहे. एखादे दिवशी तिला व्यायामाचा कंटाळा आला तरीही फिटनेस फ्रिक असलेला गौरव तिला व्यायाम करण्यासाठी भाग पाडतो. कधी उदास वाटले तरीही गौरवचा सपोर्ट असतोच. श्रृतीच्या मते या सगळ्यात रोमान्स आहे. कारण रोमान्स म्हणजे फक्त मजा नाही तर एकमेकांना समजून घेणे आहे. एकमेकांना साथ देणे आहे. आणि हे कोणत्याही ऋतूमध्ये शक्य आहे. एकत्र असण्यातच रोमान्स आहे

 

आपली प्रतिक्रिया द्या