‘ब्रॅण्ड’च्या प्रेमात

78

<< भटकेगिरी >> द्वारकानाथ संझगिरी 

माझा मुलगा खरेदीला बाहेर पडला की ब्रॅण्डच्या मोहात पडतो. माझा मुलगाच का, आजची तरुण पिढी ब्रॅण्डवेडी आहे. माझ्या कॉलेजच्या आयुष्यात मी कितीतरी कपडे, बूट रस्त्यावर घेतले आहेत. सेंट हे फक्त श्रीमंतांकडे असायचं. ‘इंटिमेट’चा सुवास स्वर्गीय मानला जायचा. आमच्यासाठी अत्तर ही चैन होती. त्यावेळी हिंदुस्थानात ब्रॅण्ड होते, पण त्याचं हिंदुस्थानीकरण पूर्णपणे झालं होतं. जॉर्ज फर्नांडिसने कोकाकोला बंद करेपर्यंत कोक मिळायचा. आवडायचाही; पण परदेशी कोक घेतल्यावर फरक कळायचा. माझा ब्रॅण्डशी पहिला संबंध १९८३ साली इंग्लंडला गेल्यावर आला. तिथल्या मित्रांमुळे असेल, दर्जामुळे असेल. मार्क्स ऍण्ड स्पेन्सर्सवर माझं जे प्रेम बसलं, ते आजही आहे. त्यानंतर प्रेमात पाडणारे अनेक ब्रॅण्ड आले. पण मार्क्स ऍण्ड स्पेन्सर्स प्रेयसीच राहिली. कारण मध्यमवर्गीय खिशाला त्यातल्या त्यात परवडणारी ही प्रेयसी आहे. आणि साथही मोलाची देते.

परदेश प्रवास वाढला. क्रिकेटपटूंशी सख्य वाढलं आणि जगभरातल्या सर्वोच्च ब्रॅण्डशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं नाही, कारण मैत्री परवडणारी नव्हती. अझरुद्दीन अरमानीचे सूट घालायचा. लाखाच्या वर त्याची किंमत. या ब्रॅण्डशी दोस्ती परवडली असती का? एकदा राजेश चौहान नावाचा क्रिकेटपटू अझरबरोबर खरेदीला गेला आणि अझरने घेतले म्हणून त्याने अडीचशे डॉलरचा एक असे दोन शर्ट घेतले. हे त्यानेच मला एकदा सांगितलं होतं. मग त्याच्या लक्षात आलं की तो शंभर डॉलरच्या सूटमध्ये अडीचशे डॉलरचा शर्ट घालणार आहे. त्याकाळी पाचशे डॉलर्समध्ये त्याच्या चुलतभावापासून मावसभावापर्यंत सर्वांचे शर्ट त्याच्या मध्य प्रदेशात मिळाले असते. अझरुद्दीन ‘बॅली’ ब्रॅण्डचे शूज घ्यायचा. एकदा मी त्याची किंमत पहायला म्हणून लंडनला दुकानात गेलो. तोंडी हिशेब लहानपणापासून पक्का असल्यामुळे मी हिशेब मांडला. तो साठ हजार निघाला. बालपणापासून थेट त्या क्षणापर्यंत मी जेवढे बूट घेतले, त्याची किंमत त्यापेक्षा कमी भरली असती. त्यानंतर एकदा एका मॅचसाठी साऊदम्प्टनला जाताना ‘बॅली’च्या दुकानाबाहेर मी सेल पाहिला. ते दुकान बंद होणार होतं. त्यामुळे किमती ७० ते ८० टक्क्याने कमी होत्या. ‘बॅली’चे बूट घ्यायची ही आयुष्यातली एकमेव संधी आहे, याची मला जाणीव झाली. बरोबर अशावेळी आपल्या पायाचे बूट मिळत नाहीत. एक साईझ लहान होती. दुसरी मोठी. मोठी साईझ घेतली. त्यात तीन इनरसोल आणि जाड मोजे घातल्यावर ते बूट कसेबसे व्हायचे. मी तरीही ते उत्साहात वापरले. लोकांचं बुटाकडे लक्ष गेलं नाही, तर ते वेधण्याचा मी प्रयत्न करायचो. कुणी विचारलं नाही तरी ‘बॅली’ शूज हे सांगण्याचा माझा प्रयत्न असायचा. बऱ्याच मंडळींना ‘बॅली’ हा ब्रॅण्ड बाटापेक्षा वेगळा वाटला नाही. एलिझाबेथ टेलर किंवा मधुबाला ही सुंदर आहे हे सांगायला लागत नाही. तसं प्रत्येक ब्रॅण्डचं नसते. प्रत्येक ब्रॅण्डच्या गोष्टीला अफलातून सौंदर्य नसतं. मी उदयपूरला मार्केटमधून दोन चपला घेतल्या. एका ब्रॅण्डकॉन्शस मित्राने विचारलं, ‘‘अरे वा, मनीष मल्होत्रा ब्रॅण्ड. काय किंमत?’’ मी म्हटलं, ‘‘उदयपूर ब्रॅण्ड दीडशेला मागितली, दोनशेला दिली. म्हणून दोन घेतल्या.’’

अर्थात, काही काही वस्तू हातात घेतल्यावर त्याची किंमत कळते. एकदा अझरुद्दीन, रमाकांत देसाई आणि मी वानखेडेवर गप्पा मारत बसलो होतो. रमाकांतला काही तरी लिहायचं होतं म्हणून त्याने अझरकडे पेन मागितलं. अझरने ते असं काढून दिलं जसं बटणात खोवलेलं गुलाब द्यावं. रमाकांतने हातात घेतल्यावर त्याच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे शब्द आले, ‘‘बढिया है।’’ आणि तितक्याच उत्स्फूर्तपणे अझर म्हणाला, ‘‘रखलो.’’ अझरचं औदार्य पाहून कर्णालाही वाटलं असतं की, आपला औदार्याचा दर्जा वाढवायला हवा. मी ते पेन हातात घेतलं. पूर्ण सोन्याचं होतं. नीबही सोन्याचं. त्या पेनाला हिरा लावला होता. शाई तेवढी निळी होती, कारण सोनेरी शाई मिळत नाही. ‘‘मॉ ब्लॅन्क’’ कंपनीचं होतं. ते लाखाचं होतं हे मला अझरच्या बोलण्यावरून समजलं. ते दिसलंही लाखाचं!

अझर ब्रॅण्ड मिरवायचा. त्यामुळे पुढे त्याच्यावर काही आरोप झाले. पण विनोद कांबळीची खरेदी हा तोंडात बोटं घालण्याचा विषय असायचा. मोठी फार खरेदी न करता दौऱ्यावरून परतणं हा गुन्हा मानला जातो, असं त्याला वाटायचं. त्याने एकदा पट्टा घेतला. अहो, पॅण्ट आवळायचा पट्टा! मी १९९३-९४ ची गोष्ट सांगतोय. तो सहाशे अमेरिकन डॉलर्सचा होता. तो ‘‘व्हर्साची’’ या ब्रॅण्डचा होता. त्याला सोन्याचं बक्कल होतं. मी त्यावेळी त्याला म्हटलं होतं, ‘‘अरे तुझी पॅण्ट इतकी ढिली झाली होती की ती आवळायला तुला सहाशे डॉलर्सचा पट्टा हवा होता.’’ बरं, त्यावेळी त्याने व्यवस्थित बाळसं धरलं होतं. त्यानंतर वर्ष-दोन वर्षांत व्हर्साची स्वर्गवासी झाला. त्यावेळी हिंदुस्थानी संघ श्रीलंकेत कुठल्यातरी स्पर्धेला होता. सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी अख्खा हिंदुस्थानी संघ एकदा विनोद कांबळीचं सांत्वन करत होता. मी कारण विचारलं. तेव्हा मला कळलं की, ‘‘व्हर्साची गेला म्हणून सर्वजण विनोद कांबळीचं सांत्वन करतायत. अनेकांचं म्हणणं होतं की, विनोदने सहाशे डॉलर्सचा पट्टा घेतला यातून व्हर्साची सावरला नाही. पुढे एकदा मी विनोदला विचारलं, ‘‘त्या पट्ट्याचं काय केलं?’’ तो गमतीनं म्हणाला, ‘‘देव्हाऱ्यात ठेवलाय आणि पूजा करतोय?’’

आता मोठे ब्रॅण्डस् हिंदुस्थानात मिळतात. प्रत्येक देशाचे वेगवेगळे ब्रॅण्डस् असतात. ते मिळत नसतील. पण जागतिक दर्जाचे ब्रॅण्डस् आपल्याकडे मनमोहन सिंगांच्या जागतिकीकरणानंतर मिळायला लागले. जगभरचं हे ब्रॅण्डस तयार करणारे हात चिनी, बांगलादेशी, हिंदुस्थानी किंवा व्हिएतनामी असतात. अस्सल युरोपियन माल कमी मिळतो. ठीक आहे, मोठ्या ब्रॅण्डसाठी राबणारे हात चांगलेच असतात. एक मूलभूत दर्जा असतोच त्याला. पण माझ्या अनुभवातून लक्षात आलंय की काही दुकानं ‘अप मार्केट’ नसतील, पण मिळणाऱ्या वस्तू टिकतात. मी लंडनला गेलो की, ऑक्स्फोर्ड स्ट्रीटवरून फेरफटका मारतोच. सेल्फरेजीक किंवा तत्सम दुकानात जाऊन श्रीमंतांसाठी काय नवं आलंय हे पाहतो. पण थोडी खरेदी मार्क्स ऍण्ड स्पेनर्समधून करतो. तेही केवळ जुन्या प्रेयसीशी वचनभंग होऊ नये म्हणून आणि तिथेच जवळ असलेल्या ‘प्रायमार्क’मध्ये शिरतो. दुकानाची ख्याती ‘जनता मॉल’ अशी! प्रचंड गर्दी असते. ते पाहून तुमच्याही लक्षात येईल की आपण कष्टकरी जनतेचे प्रतिनिधी आहोत. माल इतका स्वस्त की काय घेऊ आणि नको होतं! मी पाच-सहा वर्षांपूर्वी तिथे तीन पौंडला जीन्स घेतली. आजही घालतो. च्यायला खराब होत नाही म्हणून वैतागतो. मी तिथून दहा पौंडला शिवाजी पार्कवर फिरण्यासाठी बूट घेतले होते. मारुती कारच्या जाहिरातीत तो एक लहान मुलगा म्हणायचा, ‘‘पेट्रोल खतमही नहीं होंदा;’’ तसं मी ते बूट पायात चढवताना म्हणतो, ‘‘बूट खतमही नही होंदा.’’

असंच एक माझं लाडकं दुकान श्रीलंकेत कोलंबोत आहे. तिथे ‘ओडेल’ हे तेंडुलकर-विराट कोहली वगैरेंसाठी आहे. डोळ्याला सुखकारक, खिशाला दुःखकारक! पण मी जातो हाऊस ऑफ फॅशन्समध्ये! तिथे प्रचंड गर्दी दिसेल. काही ब्रॅण्डेड कपडे, वस्तू, टॉईज तुम्हाला दिसतील. ते खोटे ब्रॅण्ड नसतात. तो सेकंड्सचा माल असतो. पण त्यातली कमतरता आपल्याला कळत नाही. मी तिथून गुचीच्या काही टाय घेतल्या. प्रत्येकी फक्त अडीचशे रुपये. हल्ली मोठ्या हॉटेलात आलू मटार पण त्यात येत नाही. लंडनमध्ये गुचीच्या दुकानात जाऊन मी ती टाय दाखवली. त्याने शिक्कामोर्तब केलं. ‘‘अस्सल गुची.’’

तर रिकामी बॅग घेऊन कोलंबोला हाऊस ऑफ फॅशन्समध्ये जा. बॅग भरून सामान घ्या. एखाद दोन नव्या बॅगा तिथेच घ्या.

पण हो येताना मला गिफ्ट म्हणून टाय आणायला विसरू नका.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या