‘लव्ह जिहाद’ला धक्का, आवडीच्या व्यक्तीशी लग्न हा मूलभूत अधिकार!

मनपसंत जोडीदार निवडणे हा सज्ञान व्यक्तीचा मूलभूत अधिकारच आहे, घटनेनेच हा अधिकार प्रत्येक नागरिकाला बहाल केला आहे, अशा कडक शब्दांत कर्नाटक उच्च न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’च्या नावाने गळे काढणाऱया भक्तांना जबरदस्त चपराक लगावली आहे. यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयानेही सज्ञान नागरिकाला पसंतीच्या व्यक्तीसोबत विवाह करण्याचा अधिकार असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला आहे.

देशातील भाजपशासित राज्यांमध्ये लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याचा घाट घालण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने तर असा कायदाही आणला आहे. लग्नासाठी धर्मांतर करणाऱयाला कारावासाच्या शिक्षेची तरतूद त्यात करण्यात आली आहे. कर्नाटक, मध्य प्रदेशातही असाच कायदा होऊ घातला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयातील न्या. एस. सुजाता व न्या. सचिन शंकर मगदूम यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी करताना सज्ञान व्यक्तीला आपल्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे, असे स्पष्ट केले. घटनेनेच देशातील प्रत्येक नागरिकाला हा अधिकार दिल्याचे खंडपीठाने आपल्या निकालात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण

बंगळुरू येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर वाहिद खान याने राम्या नावाच्या मुलीशी विवाह केला. तीदेखील सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. मात्र, राम्याचे वडील व आईने या विवाहाला विरोध करत हा सारा प्रकार लव्ह जिहादचा असल्याचा आरोप केला. त्यानंतर राम्याला महिला संरक्षण समितीच्या देखरेखीत पाठविण्यात आले. वाहिदने हेबियस कॉर्पस् याचिका दाखल करून पत्नीला हजर करण्याची मागणी केली. न्यायालयाच्या निर्देशानंतर पोलिसांनी राम्याला हजर केले. न्यायालयासमोर जबाब देताना राम्या हिने विवाहास आई-वडिलांचा विरोध असल्याचे सांगितले.

हिंदू मुलीसोबत लग्नासाठी धर्म बदलला

हिंदू मुलीसोबत लग्न करण्यासाठी एका मुस्लिम तरुणाने आपला धर्म बदलला. या जोडप्याला पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी संरक्षण दिले आहे. हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी नुकताच लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याची घोषणा केली आहे. 1 नोव्हेंबरला या जोडप्याने हिंदू पद्धतीने विवाह केला. या जोडप्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन मुलीच्या कुटुंबापासून धोका असल्याची तक्रार केली. विवाहाला विरोध करणे म्हणजे घटनेतील कलम 21 चे थेट उल्लंघन असल्याचेही या जोडप्याने याचिकेत म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या