विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या तीन प्राध्यापकांचे निलंबन

1242

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने मित्र-मैत्रिणी आपल्या मनातील प्रेमभावना गुलाबाचं फूल देऊन व्यक्त करतात. परंतु अमरावतीच्या शाळेतील विद्यार्थिनींना वेगळीच शपथ देण्यात आली होती. प्रेम, प्रेम विवाह किंवा हुंडा घेऊन लग्न न करण्याचा निश्चय विद्यार्थिनींनी केला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला. अखेर विद्यार्थिनींना अशी शपथ देणाऱ्या तीन प्राध्यापकांचे निलंबन करण्यात आले आहे.

विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावती द्वारा संचालित महिला कला, वाणिज्य महाविद्यालय, चांदुर रेल्वे येथे राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रमात 13 फेब्रुवारी 2020 ला कार्यक्रमात प्रेमविवाह न करण्याची शपथ विद्यार्थीनींना देण्यात आली होती. त्या संदर्भात संस्थेकडुन कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. सदर प्रकरणात संस्था संपूर्णत: अनभिज्ञ होती, तसेच राष्ट्रिय सेवा योजनेच्या या कार्यक्रम पत्रिकेत सदर विषयाचा कुठेही उल्लेख केला गेला नव्हता यामुळे झालेल्या वृत्तामुळे या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

दरम्यान, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावतीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संस्थेचे सचिव युवराजसिंग चौधरी यांच्या मार्फत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. हावरे, प्रा. डॉ. पी. पी. दंदे व राष्ट्रिय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. डी. कापसे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याकरीता एक सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. तसेच कोणताही असंवैधानीक कार्यक्रमाला संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयात थारा नाही व नियमबाह्य प्रकार महाविद्यालयात खपवून घेतला जाणार नाही तसेच कोणत्याही नियमबाह्य प्रकाराची गय केली जाणार नाही, असे संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी या वेळी सांगितले.

नेमकं काय म्हणाल्या होत्या विद्यार्थिनी?
‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई वडिलांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. समजा सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी शपथ घेते.’

आपली प्रतिक्रिया द्या