साहसवेडी प्रेमकथा

207

वर्षा फडके

[email protected]

हिंदी सिनेमातले एक गाणे… ‘‘हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड चले, जीवन की हर सारी रसमें तोड चले…’’ हे गाणे कौस्तुभ खाडे आणि शांजली शाह यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत  लागू होणारे आहे. कारणही तसेच आहे… हे दोघे साहसवेडे सध्या कच्छ ते कन्याकुमारी असा प्रवास करीत आहेत.

साहस ही अशी एक गोष्ट आहे की जी माणसाला काही करायला लावते. मनात इच्छाशक्ती, चिकाटी, नियोजन असेल तर त्या साहसालाही एक मूर्तरूप देता येते. आणि म्हणूनच  तर आपण म्हणतो ना, एकदा मनाने ठरवले तर रस्ता सापडतोच तसेच या दोघांच्या बाबतीत झाले आहे.

आपल्या साहसाविषयी कौस्तुभ सांगतो की, मी आणि माझी प्रेयसी शांजली शाह सध्या चर्चेचा विषय झालो आहोत. आम्ही दोघे जे साहस करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यामुळे आम्हाला साहसवेडे वगैरे म्हटले जाते आहे. पण आम्हा दोघांना नेमके काय करायचे हे माहीत आहे. मी कच्छ ते कन्याकुमारी असा प्रवास कयाकच्या सहाय्याने करतोय तर शांजली हाच प्रवास माझ्याबरोबर सायकलवरून करत आहे. मला साथ देण्यासाठी शांजली समुद्राच्या कडेने सायकलिंग करतेय. कौस्तुभ सांगतो की, मी तर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी २०१२ मध्ये मला हायविंâगमध्ये ६ रौप्य आणि ३ ब्राँझ पदके मिळाली. त्यानंतर मी पुन्हा २०१३ मध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आणि यावेळी मी पदकांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर होतो. मुळातच असा साहसी प्रयोग करण्यामागचा मुख्य उद्देश हाच आहे की, कयाकबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी.

शांजली सांगते की, असे आगळंवेगळं साहस करताना मी स्वत: खूपच एक्साईट आहे. अनेकांना माहीत नाही की, कौस्तुभ हा एक इंजिनीयर आहे. मी मार्केटिंग क्षेत्रात नोकरी करत होतो. पण कौस्तुभच्या सान्निध्यात आल्यावर त्याच्या गेमने मलासुद्धा प्रभावित केले आणि त्याच्या साहसात माझाही वाटा असावा म्हणून मीसुद्धा साहसात सामील होण्याचे ठरविले. यापूर्वी मी मुंबई-गोवा तसेच मनाली-लेह-खारडुंगला असा प्रवास सायकलवरून पूर्ण केला आहे. त्यामुळे सायकलिंगच्या मदतीने मी कच्छ ते कन्याकुमारी प्रवास करणार आहे.

कौस्तुभ सांगतो की, कच्छ ते कन्याकुमारी हे अंतर ३३०० किलोमीटर असे आहे. मी कायकिंग आणि शांजली सायकलिंग असे हे अंतर पार करणार आहोत. हा प्रवास सुरू करण्यापूर्वी आम्हाला वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागल्या. कच्छच्या खाडीत कायकिंग करण्याची परवानगी मिळण्यासाठी अडचणी आल्या, पण नंतर परवानगी मिळाली. गोमती घाट, द्वारका येथे एस. पी. आणि कोस्ट गार्ड यांची परवानगी घेतली आहे. साधारणपणे फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत आम्ही कन्याकुमारी येथे पोहोचणार आहोत.

‘एक दुजे के लिए’ असेच कौस्तुभ आणि शांजली यांच्या बाबतीत म्हणावे लागेल. साहस या एका फॅक्टरने या दोघांना एकत्र आणले आणि आता हीच जोडी साहसपूर्ण करण्यासाठी झटत आहे. शंभर दिवसांत आपली साहसयात्रा पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. सध्या मुंबईचा टप्पा पूर्ण करून पुढील प्रवासासाठी कूच केलेल्या या जोडीला ‘नौकानयन’ खेळाबद्दल ‘कायकिंग’बद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करायची आहे. सध्या दर दिवशी सकाळी ५ वाजता हे दोघे मोहिमेला निघतात. पण तत्पूर्वी जीपीएस मॅपिंग तयार करणे, दिवसाचा क्रम ठरविणे इथपासून कुठे थांबायचे, कुठे भेटायचे असे ठरवतात तर संध्याकाळी पुन्हा दुसऱ्या दिवशी काय तयारी करायची हे ठरवतात.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या