युद्धाला जाण्यापूर्वी इस्रायलच्या दोन जवानांनी केले लग्न!

हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी इस्रायलवर केलेल्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरोधात युद्ध घोषित केले. त्यासाठी त्यांनी आपल्या सैनिकांना तातडीने सैन्यात रुजू होण्यासाठी बोलावले. त्यामुळे अनेक सैनिक सुटी रद्द करत सैन्यात दाखल झाले आहेत. यादरम्यान युद्धाला जाण्यापूर्वी दोन जवांनानी लग्न केले आहे. आम्हाला लग्न तर करायचे होते. हा निर्णय घाईघाईत घेण्यात आलेला नाही. आमच्यासाठी देशाच्या रक्षणाला प्राधान्य आहे. त्यामुळे लग्न सोहळा पूर्ण करत लगेचचे युद्धासाठी जाणार असल्याचे या जवानांनी सांगितले. युद्धाच्या धामधुमीत या जवानांच्या लग्नाचीही चर्चा होत आहे.

इस्रायलने हमासविरोधात जबरदस्त प्रतिहल्ला चढवला आहे. त्यामुळे गाझापट्टी मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे. इस्रायलच्या बॉम्बवर्षावामुळे गाझामध्ये सर्वत्र आगीचे लोळ आणि ढासळलेल्या इमारतीचे ढिगारे दिसत आहेत. या युद्धात आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त इस्रायली नागिरकांचा मृत्यू झाला आहे. तर 2400 जण जखमी झाले आहे. तसेच आमच्या 150 लोकांना हमासने आलीस ठेवल्याची पुष्टीही इस्रायलकडून करण्यात आली.

या युद्धाच्या परिस्थितीत इस्रायलने त्यांच्या सैन्यातील जवानांना तातडीने सैन्यात रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा दलाचे प्रवक्ते रियर एडमिरल डेनियल हगारी यांनी सांगितले की, आमच्या सैन्यातील सुमारे 3,00,000 राखीव जवानांना तातडीने रुजू होण्याचे आदेश देत त्यांना योग्य ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. 48 तासात आम्ही 300,000 जवानांना तैनात केले आहे, हे आमचे मोठे यश असल्याचे ते म्हणाले.

सैन्याकडून तातडीने रुजू होण्याचे आदेश आल्यानंतर सुटीवर असलेले जवान उरी निंटजर आणि एलिनोर योसेफिन यांनाही सैन्यात तातडीने रुजू होण्याचे आदेश आले. हे आदेश मिळताच त्यांनी युद्धाला जाण्यापूर्वी रात्रीच विवाहसोहळा उरकला. आम्ही युद्धावरून जिंवत परतलो नाही तर निदान एकदुसऱ्याचे झाल्यानंतर मरणाचे समाधान असेल, असे त्यांनी सांगितले. आम्हीही लग्नाबाबत अनेक स्वप्ने बघितली होती पण अशा परिस्थितीत लग्न करावे लागेल, असे वाटले नव्हते. कुटुंबिय आणि मित्रांसोबत लहान विवाहसोहळा आयोजित करून आम्ही लग्न केले आहे. युद्धाला जाण्यापूर्वी लग्न केल्याने आमच्यातील नाते अधिक दृढ झाले आहे. युद्धावरून सुरक्षित परतलो तर जंगी पार्टी करू, असे मिंटजर यांनी सांगितले.