Lpg Cylinder Shortage – ऑफिसला येताना जेवणाचा डबा घेऊन यावा; आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना सूचना, चेन्नई, बंगळुरूतील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि एलपीजी पुरवठ्यातील अडचणींमुळे हिंदुस्थानातील उद्योगांवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. HCLTech ने स्वयंपाकाच्या गॅसच्या कमतरतेमुळे त्यांच्या चेन्नई कार्यालयातील कर्मचाऱ्यांना १२ आणि १३ मार्चला घरून काम करण्याचा पर्याय दिलेला आहे. कंपनीच्या कॅफेटेरियामध्ये स्वयंपाकासाठी लागणारा एलपीजी गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक विक्रेत्यांना कामकाज थांबवावे लागले. त्यामुळे कार्यालयातील अन्नपुरवठा विस्कळीत झाला. या पार्श्वभूमीवर कंपनीने कर्मचाऱ्यांना दोन दिवस घरुनच काम काम करण्याची परवानगी दिली आहे.

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी Infosys ने पुणे, बेंगळुरू आणि चेन्नई येथील आपल्या कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांना कळवले आहे की, व्यावसायिक एलपीजीच्या कमतरतेमुळे फूड कोर्ट सेवांमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये कंपनीने स्पष्ट केले आहे की, एलपीजी पुरवठा खंडित झाल्यामुळे कॅन्टीनमधील मेनू मर्यादित ठेवण्यात येईल.

विशेषतः डोसे, ऑम्लेट यांसारखे पदार्थ तयार करणारे लाईव्ह कुकिंग काउंटर पुढील सूचना मिळेपर्यंत तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहेत. या अशा बिकट परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांना घरून डबा आणण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या मते, पश्चिम आशियातील तणाव आणि ऊर्जा पुरवठ्यातील अडथळे कायम राहिल्यास त्याचा परिणाम हिंदुस्थानातील उद्योग, सेवा आणि दैनंदिन जीवनावर आणखी वाढू शकतो.