गॅस सिलिंडर 145 रुपयांनी महागला

311

घरगुती वापराच्या विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये तब्बल 145 रुपयांची वाढ झाली आहे. सहा वर्षांनंतर ही उच्चांकी दरवाढ असून, यामुळे महागाईचा आणखी भडका उडाला आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ही मोठी दरवाढ केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई, पुण्यासह सर्व महानगरांमध्ये 14 किलो विनासबसिडी (विनाअनुदानित) गॅस सिलिंडरच्या किंमतीत 144.50 रुपयांची वाढ केली. 5 किलोचे सिलिंडर 52 रुपयांनी महागले आहे. जानेवारी 2014 मध्ये विनासबसिडी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 220 रुपयांनी दरवाढ केली होती. सहा वर्षांनंतरची ही प्रचंड दरवाढ आहे. अर्थसंकल्पापूर्वी व्यावसासिक गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये 225 रुपयांनी वाढ केली होती. सध्या व्यावसायिक वापरासाठीचे सिलिंडर 1550 रुपयांना मिळत आहे. आता घरगुती वापराच्या विनासबसिडी गॅस सिलिंडरची मोठी दरवाढ केली आहे. 12 सिलिंडरसाठी सबसिडी मिळेल; पण त्यानंतरच्या सिलिंडरसाठी जादा पैसे नागरिकांना मोजावे लागणार आहेत. यामुळे महागाईचे आणखी चटके बसणार आहेत.

महागाई निर्देशांक 7.59 टक्क्यांवर

अर्थसंकल्पानंतरही महागाईमध्ये वाढ कायम आहे. जानेवारी 2020 मध्ये महागाई निर्देशांक 7.59 टक्क्यांवर गेला आहे. डिसेंबरमध्ये हा निर्देशांक 7.35 टक्के होता. अन्नधान्याच्या किमतीत 13.73 टक्क्यांनी वाढ झाली. गेल्या वर्षी जानेवारी 2019 मध्ये हा निर्देशांक उणे 2.24 टक्के होता. एका वर्षात महागाईमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आर्थिक मंदीमुळे वाढलेली बेरोजगारी आणि महागाई यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे.

महानगर आणि सिलिंडरची किंमत

  • दिल्ली – 858 रुपये
  • मुंबई – 859 रुपये
  • कोलकाता – 896 रुपये
  • चेन्नई – 881 रुपये
आपली प्रतिक्रिया द्या