मध्यमवर्गीय गॅसवर…सिलिंडर महिन्याला ४ रुपयांनी महागणार

7
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवरील केंद्र सरकारकडून देण्यात येणारे अनुदान (सबसिडी) मार्च 2018 पर्यंत पूर्णपणे बंद होणार असून दरमहा सिलिंडरची किंमत 4 रुपये वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य जनतेवर महागाईचा बोजा आणखी वाढणार आहे.

जीएसटीमुळे गॅस सिलिंडर आधीच महाग झाले आहे. सिलिंडरवर 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. तसेच नवे कनेक्शन, गॅस तपासणीही महागली आहे. यावर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे; परंतु गॅस सिलिंडरचे अनुदानच बंद करण्याचा सरकारचा विचार असल्याचे आज लोकसभेत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लेखी उत्तरात सांगितले.

जनतेवर भुर्दंड पडणार

धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, 1 जुलै 2016 पासून केंद्र सरकारने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपीसीएल) या कंपन्यांना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये दरमहिन्याला 2 रुपये वाढ करण्यास सांगितले होते. आता ही वाढ 4 रुपये करण्यात येणार आहे.

सध्या दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला 12 सिलिंडर सबसिडी दराप्रमाणे दिले जातात. सबसिडीच पूर्णपणे काढून टाकली तर जनतेला विनासबसिडी म्हणजे बाजारभावाप्रमाणे सिलिंडर खरेदी करावे लागतील. त्यामुळे बँकेत जमा होणारी सबसिडी बंद होईल.

दिल्लीत सध्या घरगुती वापराचा सबसिडी एलपीजी सिलिंडर 477.46 रुपयांना मिळतो. गेल्या वर्षी 411.18 रुपयांना मिळत होता. सुमारे 66 रुपयांची वर्षभरात वाढ झाली आहे. विनाअनुदानित सिलिंडर सध्या 564 रुपयांना मिळतो.

मार्च 2018 पर्यंत किंवा तत्पूर्वी अनुदान संपुष्टात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

सीएनजी दहशत

चेंबूरमध्ये सोमवारी सीएनजी गॅसच्या पाइपलाइनमधून मोठय़ा प्रमाणावर गॅसगळती झाली आणि दहशत पसरली. खबरदारीचा उपाय सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक सुमारे तासभर रोखून धरण्यात आली होती. इमारतीही रिकाम्या कराव्या लागल्या.

आपली प्रतिक्रिया द्या