एलएसडी – ऊँचे लोग ऊँची नशा

118

>>आशीष बनसोडे [email protected] 

मुंबई अमली पदार्थविरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटने चार दिवसांपूर्वी एक धडक कारवाई केली. उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पाच तरुणांना मालाडमध्ये लाखो रुपये किमतीच्या ‘एलएसडी’ या ड्रग्जसह पकडले. अरबाज खान, फरहान खान, अद्यम्य मोदी, चिराग जैन, लक्ष्मण ऊर्फ निखिल राजन अशी या तरुणांची नावे. अरबाज हा ऋतंबरा महाविद्यालयात बीएमएसचा पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे. तर फरहान हा रिअल इस्टेट आणि कार डीलरचे काम करतो. अद्यम्य हा बीएमएमचा विद्यार्थी असून ‘झी’ टीव्हीत प्रोडय़ुसरचे काम करतो. ऋतंबरा महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या चिराग आणि बीएस्सी आयटीचे शिक्षण घेतलेला लक्ष्मण हेदेखील ड्रग्जच्या आहारी गेलेत. या सर्वांची ओळख डिस्कोमध्ये झाली. तेथेच त्यांना ड्रग्जची चटक लागली. विशेष म्हणजे यांना अमेरिकेतील त्यांचा मित्र पार्टी ड्रग्जचे पार्सल पाठवतो. आतापर्यंत गांजा, चरस, एमडी, कोकेन हे ड्रग्ज घेतले जातात एवढेच माहीत होते. पण त्यापलीकडेदेखील ड्रग्जची वेगळी यादीच आहे. पार्ट्या आणि डिस्कोमध्ये ‘एलएसडी’चा बोलबाला असतो. ‘एलएसडी’ म्हणजे विशिष्ट प्रकारचा पेपर असतो. अर्धा इंचाच्या आकाराचे चौकोन असा तो पेपर असतो. त्या चौकानावर ५० ते हजार मायक्रोन्स क्षमतेच विशिष्ट लिक्विड टाकले जाते. या एका चौकोनाची किंमत दोन ते पाच हजार अशी असते. एलएसडी खाण्याची पद्धत निराळीच आहे. ड्रग्ज असलेला हा कागदाचा बारीकसा तुकडा पार्टी किंवा डिस्कोमध्ये गेल्यानंतर जिभेवर ठेवून टाळूला चिटकवायचा. बस्स क्षणार्धात मनुष्य वेगळ्याच विस्वात जातो. १२ तास त्याचे मेंदूवरचे नियंत्रणच सुटते. आपण काय करतोय, कुठे आहोत काहीच समजत नाही. सगळे काही भन्नाट असते.

मृत्यूलाही कवटाळते

ड्रग्ज घेतल्यानंतर मेंदूवरचा ताबाच सुटतो. त्यावेळेस मनुष्य जो विचार करतो तेच आजूबाजुला घडत असल्याचा त्याला भास होत असतो. वाईट विचार केला तर १२ तास आपल्यासोबत वाईट घडतेय असेच वाटू लागते. अशा अवस्थेत संबंधित नशेबाज एखाद्याची हत्या करू शकतो किंवा आत्महत्यादेखील करू शकतो.

पंचतारांकित हॉटेल्समधील पार्ट्या असो वा  क्लबमधील डिस्को, ड्रग्जची नशा तेथे मस्ट असते. ड्रग्ज घेतल्याशिवाय माहोल बनतच नाही. वेगळ्या प्रकारची एनर्जी अंगात संचारतच नाही. हे तसे सर्वश्रुत आहे. पण त्या पार्ट्यांमध्ये नेमके असे कुठले ड्रग्ज घेतात हा सर्वांनाच पडणारा प्रश्न. मात्र त्या प्रश्नाचे उत्तर ऐकल्यावर मग आपल्यालाच गरगरल्याशिवाय राहत नाही. एलएसडी अर्ध्या इंचाचा चौकोनी पेपर. जितका लहान आणि महाग तितकी नशाही भन्नाट.

शंकर, बुद्धा आणि दलाई लामा

इन्व्हलपमध्ये लपवून हा एलएसडीचा साठा अमेरिकेतून मुंबईत पार्सल पाठवला जातो. या इन्व्हलपवर शंकर, लॉर्ड बुद्धा तसेच दलाई लामा यांचे फोटो चिटकवलेले असतात. शंकराचा फोटो असेल तर त्या इन्व्हलपमधील ड्रग्ज कमी इफेक्टचा, लॉर्ड बुद्धांचा फोटो असल्यास चांगल्या दर्जाचा आणि दलाई लामा यांचा फोटो असेल तर त्या इन्व्हलपमधील ड्रग्ज उच्च प्रतीचे व जास्त किमतीचे. अशा प्रकारे या ड्रग्ज तस्करांचा कोडवर्ड असतो.

इंटरनेटकर व्यवहार

वेगवेगळ्या प्रकारचा एलएसडी पेपरचा साठा परदेशातून मुंबईत पाठवला जातो. तस्कर या ड्रग्जचा व्यवहार इंटरनेटच्या माध्यमातून करतात. एकदा का पार्सल हाती पडले की त्या ड्रग्जची क्वॉलिटी कशी आहे त्याकर त्यासाठी बोली लावली जाते. मग हजार-पंधराशे रुपयांत खरेदी केलेले ड्रग्ज वाटेल त्या किमतीत किकले जाते. पण ड्रग्ज कुठे, कधी मिळणार यासाठी नशेबाज आणि तस्कर इंटरनेटच्या माध्यमातून सौदा करतात. पकडले जाऊ नये यासाठी इंटरनेटची मदत घेतली जाते.

थांबा आणि कळवा

पार्ट्यांमध्ये घेतले जाणारे हे ड्रग्ज अत्यंत घातक आहे. एकदा का त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्या आहारीच जातो. सुरुवातीला काहीतरी वेगळे करीत असल्याची वेगळी मजा येते असे म्हणतात. पण तेथून आपल्या शरीराची चाळण होण्यास सुरुवात होते. शरीरातील विविध अवयवांवर त्यांचा हळूहळू घातक परिणाम होण्यास सुरुवात होते. दुर्दैवाने उच्चशिक्षित तरुण पिढी ड्रग्जच्या आहारी जाऊ लागली आहे. तेव्हा वेळीच थांबा, कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी केले आहे.

कोडवर्ड

मॅड हिटर्स, शिवा हनुमान, स्पेस बुद्धा, स्पेस टपर, ऍलेस इन, वंडर लाइन, मेक्सिकन स्कल्स, दलाई लामा, कॅलिफोर्निया सनशाईन, रेड-ग्रीन-येलो हॉफमॅन, गुड ट्रीप-बॅड ट्रीप, एलएसडी आणि एलएसए, स्मायली, कालिज.

आपली प्रतिक्रिया द्या