नासाच्या अंतराळ मोहिमेत हिंदुस्थानी वंशाचा अंतराळवीर

19

सामना ऑनलाईन । ह्युस्टन

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या आगामी मोहिमेसाठी १२ नव्या अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. या अंतराळवीरांमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या राजा चारी यांचा समावेश आहे. तब्बल १८,३०० अर्जांमधून ही निवड झाली आहे. निवडण्यात आलेल्या अंतराळवीरांना आगामी मोहिमेसाठी २ वर्षांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

नासाने निवडलेल्या १२ अंतराळवीरांमध्ये सात पुरुष आणि पाच महिला आहेत. मागील २० वर्षांतील सर्वात मोठी टीम अंतराळ मोहिमेसाठी निवडण्यात आली आहे. निवडण्यात आलेल्या अंतराळवीरांपैकी सहा लष्करी अधिकारी, ३ शास्त्रज्ञ, २ वैद्यकीय डॉक्टर आणि १ अंतराळ अभियंता आहे.

नासाने निवडलेले अंतराळवीर लेफ्टनंट कर्नल राजा चारी ३९ वर्षांचे आहेत. त्यांनी ४६१व्या फ्लाइट टेस्ट स्क्वाड्रनचे कमांडर आणि कॅलिफोर्नियातील एडवर्ड विमानतळावरील एम 35 इंटीग्रेटेड टेस्ट फोर्सचे संचालक म्हणून आधी काम केले आहे. वॉटरलूमध्ये राहणाऱ्या चारी यांनी एमआयटीमधून एरोनॉटिक्सची मास्टर डिग्री घेतली आहे. यूएस नेव्हल टेस्ट पायलट स्कूलमधून त्यांनी ग्रॅज्युएशन केले आहे.

चारी यांचे वडील हिंदुस्थानी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या