अनुकूल दान…

219

नीलेश मालवणकर, [email protected]

बऱयाचदा प्रतिकूल वाटणारं नशिबांचं दान ध्यानीमनी नसताना आपल्या बाजूने पडतं

‘मम्मा, प्लीज खेळ ना माझ्याशी सापशिडी’’ आशयने मम्माला विनवलं.

‘‘बाहेर जाऊन खेळ ना, बेटा.’’

‘‘ती मोठी मुलं मला नाही खेळायला घेत.’’

‘‘मग पप्पांबरोबर खेळ ना.’’

‘‘पप्पा टीव्हीवर मॅच बघताहेत.’’

असहायपणे सुस्कारा टाकत अनन्या आशयबरोबर सापशिडी खेळू लागली. ऑफिसमधल्या शुक्रवारच्या घडामोडींमुळे तिचं डोकं आजही ठणकत होतं. आज सोमवारीदेखील तिने ऑफिसला दांडी मारली होती.

सापशिडी खेळताना तिच्या डोक्यात ऑफिसचेच विचार घोळत होते.

तिने फासे टाकले. आशय खिदळला, ‘‘हेहे मम्मा, तुला सापाने खाल्लं.’’

पटावर जे दान पडलं त्यामुळे तिचं प्यादं नेमकं सापाच्या तोंडात गेलं होतं.

आपल्या ऑफिसमध्येदेखील हे असंच घडतंय. तिच्या मनात विचार आला. या वेळेस तिला मार्केटिंग हेडची जबाबदारी अपेक्षित होती पण नेमका तो साप – नागेश – आडवा आला. वरिष्ठांना मस्का लावून त्याने अनन्याचं प्रमोशन गिळलं. नोकरी बदलण्याचा विचारही अनन्याने केला होता, पण जॉब मार्केट थंड होतं.

नागेशने तिचं प्रमोशन बळकावलं हेच नागेशवर चिडण्याचं एकमेव कारण नव्हतं. त्या माणसाची नजर आणि नियतदेखील साफ नव्हती. त्याने म्हणे त्याच्या पर्सनल सेक्रेटरीला – सुझीला – बाहेर हॉटेलात ‘भेटण्याची’ ऑफर दिली होती. सुझीसारखी फटकळ तरुणी गप्प कशी बसली याचं अनन्याला आश्चर्य वाटलं होतं. जॉबची गरज असल्यामुळे असेल.

अनन्याचा फोन वाजला. रिंकीचा फोन. रिंकी बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधल्या मराठेंची सेक्रेटरी.

‘‘अनन्या अभिनंदन!’’

‘‘कशाबद्दल?’’

‘‘कंपनीची मार्केटिंग हेड म्हणून तुझी नेमणूक होतेय.’’

‘‘पण ते प्रमोशन तर त्या नागोबाला मिळालं होतं ना?’’

‘‘नागोबाचा गाशा गुंडाळला.’’

‘‘काय सांगतेस…! कशामुळे?’’

‘‘त्याच्या सेक्रेटरीने त्याच्यावर सेक्श्युअल हॅरेसमेंटचा आरोप केला. पुरावे म्हणून व्हिडीओ टेप्ससुद्धा दिल्या हायर मॅनेजमेंटला. नागोबाला तिथल्या तिथे नारळ मिळाला. त्याच्या जागी मार्केटिंग हेड म्हणून तुझं नाव पुढे आलं. कमिटीने ताबडतोब तुझ्या नावाला पाठिंबा दर्शविला. उद्या तू ऑफिसला आलीस की तुझ्याशी बोलून अधिकृत घोषणा करतील.’’

‘‘रिंकी… आय एम सो हॅप्पी.’’

‘‘नुसतं बोलून कटवू नकोस.’’

‘‘नक्की डीअर. पार्टी तो बनती है.’’

अनन्याने फोन ठेवला. तिची डोकेदुखी गायब झाली होती. या वेळेस नशिबाचे फासे अगदी अनुकूल पडले होते.

आशयने फासे तिच्याकडे देत म्हटलं, ‘‘मम्मा, आता तुझा टर्न.’’

‘‘हो बेटा’’ तिने फासे टाकले.

आशयने दान पाहिलं आणि तो आनंदाने चित्कारला, ‘‘वॉव मम्मा. तुला शिडी मिळाली. आता तू नक्की जिंकणार.’’

 

आपली प्रतिक्रिया द्या