कुंडलीत ‘तुरुंग योग’ असल्याने त्याने स्वत:ला केलं लॉकअपमध्ये बंद

jail-crime

सामना ऑनलाईन। लखनौ

तुरुंगाचं नुसतं नावही काढलं तरी भलेभले हादरतात. ती काळीकुट्ट खोली, त्यातल ते भयाण वातावरण याबद्दल विचार केला तरी मन थरारतं. पण लखनौमध्ये कुंडलीत तुरुंग योग असल्याने एका तरुणाने स्वत:ला २४ तास लॉकअपमध्ये बंद केल्याची मजेशीर घटना घडली आहे. विशेष म्हणजे यासाठी त्याने जिल्हा प्रशासनाला रीतसर अर्जही केला. त्यात ज्योतिषाने भविष्यात आपल्याला तुरुंगात जावे लागेल असे सांगितल्याने ती शिक्षा आपण आताच भोगू इच्छित असल्याचं या तरुणाने नमूद केलं होतं. जेल प्रशासनाने त्याचा अर्ज मंजूरही केला. त्यानंतर तो स्वत:हून तुरुंगात गेला. रमेश सिंह असे या तरुणाचे नाव आहे.

दरम्यान, कुठलाही गुन्हा केलेला नसताना केवळ ज्योतिषाने भविष्यात तुरुंग योग आहे असे सांगितल्याने आताच एक दिवस तरी तुरुंगात बंद करून घ्या अशी विनंती करणारे डझनभर अर्ज वर्षभरात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतात, असे लखनौचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितले आहे. रमेशने देखील असाच अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला होता. सोबत कुंडलीची प्रतही जोडली होती. त्यानंतर अशा प्रकरणातील कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्याला लॉकअपमध्ये टाकण्यात आले. तिथे त्याने तुरुंगाचे सर्व नियम काटेकोर पद्धतीने पाळले. तो रात्री जमिनीवर झोपला. इतर कैद्यांना देण्यात येणार जेवण त्यानेही केलं. रात्रभर तो जागा होता. २४ तासानंतर त्याला सोडण्यात आलं, तेव्हा मात्र रमेश भलताच खूश होता. कारण ज्योतिषाने २४ तास तुरुंगात राहिल्यानंतर त्याच्यावरचं गडांतर टळेल, अशी भविष्यवाणी ज्योतिषाने केली होती.

summary-/lucknow-man-put-in-police-station-lock-up-because-astrologer-suggested-jail-