चिंताजनक! नव्या कोरोनाग्रस्तांची फुफ्फुसे लवकर खराब होण्याचे प्रमाण वाढले

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या राज्यात पुन्हा वाढायला लागली आहे. ही बाब एकट्या राज्यासाठीच चिंतेची बाब नसून ती सर्वसामान्यांसाठीही चिंतेची आहे. नव्या कोरोनाग्रस्तांचे छातीचे एक्स-रे पाहिल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांची स्थिती ही झपाट्याने खराब झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही बाब उजेडात आणली आहे. पूर्वीच्या तुलनेत कोरोनाचा विषाणू हा कित्येक पटीने शक्तिशाली झाला असून तो शरीरावर अधिक ताकदीने हल्ला करू लागल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

कोहिनूर रूग्णालयातील छातीरोग तज्ज्ञ डॉ. राजरतन सदावर्ते यांनी सांगितले की, ‘‘आधी रूग्णाच्या फुफ्फुसात हळूहळू बदल दिसून येत होतो. परंतु, आता फुफ्फुसे लवकर खराब होत आहेत. फुफ्फुसे खराब झाल्याची तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून अशा रूग्णांवर उपचार करणं डॉक्टरांसाठी अवघड होत आहे. रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांचे एक्स-रे रिपोर्ट पाहिल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसाची स्थिती खूपच वाईट आहे. या रूग्णांना श्वास घ्यायला त्रास होत होता. यातील बहुतांश रूग्ण हे वयोवृद्ध किंवा कुठला ना कुठला आजार असणारे आहेत.’’ डॉ.सदावर्ते यांनी लोकांच्या अक्षम्य बेफिकीरपणावर नाराजी व्यक्त केली आहे. अनेकजण विनामास्क रस्त्यांवर फिरत असून अशा लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाचा फैलाव वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदय आणि किडनीचे विकार असणाऱ्या रूग्णांनी कोरोनाची लागण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या