आलिशान डेक्कन ओडिसीचे वय झाले! चार-पाच वर्षांत इतिहासजमा होणार

देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या डेक्कन ओडिसी या आलिशान ट्रेनचे आता वय होत आले आहे. रेल्वे कायद्यानुसार 25 वर्षांच्या सेवेनंतर रेल्वे गाडीला सेवेतून बाहेर केले जाते. महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही गाडी आजपासून पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली असली तरी तिचे वय वीस वर्षे झाले आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी पर्वणी ठरलेली ही आलिशान गाडी पुढील चार-पाच वर्षांत पर्यटकांच्या सेवेतून बाहेर पडणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठीची ही आगळवेगळी गाडी इतिहास जमा होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

जागतिक स्तरावर किर्ती असलेली डेक्कन ओडिसी ही गाडी केंद्र आणि राज्य सरकारच्या परवानगीने रेल्वेच्या चेन्नई येथील इंटेग्रल कोच फॅक्टरीत 2003 मध्ये तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने चालवली जाणारी ही गाडी 2004 मध्ये पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे. नियमितपणे प्रवाशांच्या सेवेत असलेली ही गाडी मार्च 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे बंद ठेवण्यात आली होती. त्यांनतर आता तीन वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे. एमटीडीसीने 2.0 अंतर्गत ही गाडी नव्या रूपात प्रवाशांसाठी सज्ज केली असली तरी गाडीचे आता वय झाल्याचे सहजपणे दिसत आहे.

डेक्कन ओडिसीतील 17 कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी कधी?

डेक्कन ओडिसी लक्झरी ट्रेन टुर्सच्या व्यवहारात तब्बल 17 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे 2014 मध्ये समोर आले होते. याप्रकरणी कोटय़वधी रुपयांचे भाडे थकवणाऱया दिल्लीच्या लक्झरी हॉलिडेजविरोधात कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. डेक्कन ओडिसीच्या टुर्सचा व्यवहार पाहण्याचे काम एमटीडीसीने दिल्लीच्या लक्झरी हॉलिडेज या खासगी एजन्सीला सोपवले होते. या एजन्सीकडून कुठल्याही प्रकारची बँक गॅरंटी किंवा अनामत रक्कम घेतली नव्हती. त्यातच टुर्ससाठी प्रवाशांकडून गोळा केलेले तब्बल 17 कोटी रुपये या एजन्सीने महामंडळाकडे जमा केले नसल्याचा आरोप एमटीडीसीचे सेवानिवृत्त अधिकारी दिलीप आजगावकर यांनी केला आहे. माहिती अधिकाराखाली त्यांनी कंपनीने 17 कोटी रुपयांपर्यंतचे भाडे थकवल्याचे उघड केले होते. विशेष म्हणजे एजन्सीने महामंडळाला दोन कोटी रुपयांचा दिलेला धनादेशही बाऊन्स झाला होता, अशी माहिती त्यांनी दै. ‘सामना’शी बोलताना दिली.

रेल्वेच्या प्रत्येक डब्याचे किंवा ट्रेनचे कमाल आयुर्मान जास्तीत जास्त 25 वर्षे एवढे आहे. त्यापेक्षा जास्त जुना डबा सेवेत ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे असते. त्यामुळे तो सेवेतून काढणे बंधनकारक आहे.
 डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे