‘कॅप्टन कूल’ धोनीची नवी इनिंग, अॅनिमेटेड सीरिजमध्ये बनणार ‘गुप्तहेर’

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. धोनी एका अॅनिमेटेड सीरिजची निर्मिती करणार आहे. या सीरिजचे नाव ‘कॅप्टन-7’ असून ही सीरिज धोनीच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. आयपीएलचा 14 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी त्याने याची घोषणा केली.

एमएस धोनी मैदानावर नेहमीच 7 नंबरच्या जर्सीवर दिसायचा. आयपीएलमध्येही त्याच्या जर्सीच्या मागे 7 नंबर आहे. त्यामुळेच त्याने आपल्या अॅनिमेटेड सीरिजचे नाव कॅप्टन-7 असे ठेवले आहे. या सीरिजच्या पहिल्या भागावर काम सुरू असून महेंद्रसिंग धोनी आणि साक्षी धोनीचे प्रोडक्शन हाऊस ‘धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड अँड ब्लॅक व्हाईट ऑरेंज ब्रँड प्रायव्हेट लिमिटेड’ यानंतर बॅनर अंतर्गत बनणारी ही पहिली सीरिज आहे.

हेरगिरीवर आधारित पहिली अॅनिमेटेड सीरिज

दरम्यान, हेरगिरीवर आधारित देशातील ही पहिली अॅनिमेटेड सीरिज असणार आहे. सध्या या सीरिजचे प्री-प्रोडक्शन सुरू असून पुढील वर्षी 2022 मध्ये याचा पहिला भाग प्रदर्शित केला जाणार आहे.

रोमांचक सीरिज

धोनीने या सीरिजबाबत बोलताना सांगितले की, या सीरिजची कथा आणि कंसेप्ट चांगली आहे. यामुळे मला क्रिकेट व्यतिरिक्त माझ्या अन्य आवडीनिवडी जगता येतील. तर साक्षी धोनी म्हणाली की, आमच्यासमोर माहीच्या आयुष्यावर आधारित अॅनिमेटेड फिक्शन सीरिजची कंसेप्ट आली तेव्हा आम्ही त्यास तात्काळ होकार दिला, ही सीरिज रोमांचक असेल, असेही ती म्हणाली.

दरम्यान, धोनीच्या आयुष्यावर आधारित याआधी एक चित्रपटही तयार करण्यात आला होता. सुशांत सिंह राजपूत याने या चित्रपटामध्ये धोनीची भूमिका साकारली होती, तर कियारा आडवाणी हिने साक्षी धोनीची भूमिका केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या