कोयता गँगची तपकीर गल्लीसह जनवाडीत दहशत

कोयत गँगने तपकीर गल्लीतील मोबाइल मार्केटमध्ये कोयते घेऊन दहशत माजविल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. तर गोखलेनगर भागातील जनवाडीत टोळक्याने दहशत माजवून पाच रिक्षा तसेच मोटारीची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली.

तपकीर गल्लीतील व्यापारी संकुलात मोबाइल विक्री दुकाने आहेत. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तिघे जण कोयते घेऊन मोबाइल मार्केटमध्ये शिरले. एका दुकानदाराला धमकावून टोळक्याने तोडफोड केली. तोडफोडीच्या घटनेमुळे या भागात घबराट उडाली. फरासखाना पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

जनवाडीत कोयता गँगकडून वाहनांची तोडफोड केल्या प्रकरणी टोळक्याच्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजू तुकाराम धानेकर (वय 42, रा. जनता वसाहत, जनवाडी) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. धानेकर यांनी त्यांची मोटार घराजवळ लावली होती. पहाटे चारच्या सुमारास तिघे जण जनता वसाहत परिसरात आले. तिघांनी चेहरे रुमालाने झाकले होते. त्यांच्याकडे कोयते आणि दांडके होते. आरोपींनी परिसरात लावलेल्या पाच रिक्षांच्या काचा फोडल्या तसेच धानेकर यांच्या मोटारीची तोडफोड केली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून तोडफोडीमागचे कारण समजू शकले नाही.