2.47 लाख वर्षांपूर्वीच्या दगडी हत्यारांमुळे इतिहास नव्याने लिहावा लागणार, हत्यारांचा शोध हिंदुस्थानातच लागल्याचे सिद्ध

जवळपास 1.25 लाख वर्षांपूर्वी मानव आफ्रिकेमधून हिंदुस्थानात आला आणि तो त्याच्यासोबत दगडाची हत्यारे आणि शस्त्र घेऊन आला होता असं सांगितलं जातं. मात्र हा समज खोटा ठरवणारे संशोधन हिंदुस्थानातील संशोधकांने केले आहे. 2018 साली आंध्र प्रदेशात करण्यात आलेल्या उत्खननामध्ये जी दगडी हत्यारे सापडली होती ती आपल्या देशातच बनवण्यात आली होती असं निष्पन्न झालंय. ज्या काळात आफ्रिकेतून मानव हिंदुस्थानात आल्याचं सांगितलं जातंय त्याच्या कित्येक वर्ष आधी ही हत्यारे बनवण्यात आली होती असंही या संशोधनातून दिसून आलंय.

आंध्र प्रदेशात जे प्राचीन अवशेष सापडले होते त्यांचे वय निश्चित करण्यासाठी अहमदाबादच्या एका प्रयोगशाळेत चाचण्या करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांच्या निष्कर्षांनंतर आतापर्यंत सांगण्यात आलेला इतिहास हा अचूक नसल्याचं सिद्ध झालंय. आतापर्यंत असं सांगितलं जात होतं की आफ्रिकेतून मानव अरब द्वीपावरून पश्चिम आशिया मार्गे हिंदुस्थानात पोहोचला होता. या मानवानेच दगडी हत्यारे आणि शस्त्रे त्याच्यासोबत आणली होती असंही आतापर्यंत सांगितलं जात होतं. मात्र आंध्र प्रदेशात जी दगडी हत्यारे-शस्त्र सापडली आहेत ती या घटनेच्या किमान 1.22 लाख वर्षांपूर्वीची आहेत.

एमएस विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी आंध्र प्रदेशातील ओंगोले जिल्ह्यातल्या हनुमानथुनीपाडू इथे करण्यात आलेल्या खोदकामादरम्यान सापडलेल्या दगडी हत्यारांचे वय निश्चित करण्याचं ठरवलं होतं. यामध्ये त्यांना कळालं की ही दगडी हत्यारे ही 2.47 लाख वर्ष जुनी आहेत. त्यांच्या या संशोधनामुळे हिंदुस्थानातील मानवाच्या उत्क्रांतीचा नवा आयाम जगासमोर आला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की दगडापासून हत्यारे बनवण्याचे तंत्रज्ञान हे हिंदुस्थानातच आधुनिक मानव इथे येण्यापूर्वीच विकसित झालं होतं. थोडक्यात सांगायचे झाल्यास आफ्रिकेतून मानव हिंदुस्थानात येण्याच्या आधी इथला मानव हा दगडी हत्यारांचा वापर शिकार करण्यासाठी, अन्न गोळा करण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी करायला शिकला होता.