मुद्रा – केशवसुत स्मारक

लता गुठे

गणपतीपुळय़ापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेलं माडगूळ गाव.  पर्यटकांचं आकर्षण म्हणजे तेथील ‘केशवसुत स्मारक’. ज्याची निर्मिती पद्मश्री मधु मंगेश कर्णिक कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक यांनी अतोनात कष्ट करून केशवसुत स्मारक उभं केलं आणि आज ती कवितेची राजधानी झाली. मधुभाईंच्या मनात असलेला कवी केशवसुत यांच्याविषयी आदर आणि त्यांच्या कवितांवर असलेले नितांत प्रेम प्रकर्षाने जाणवते.

गणपतीपुळे आलं की गजाननाचे दर्शन घेऊन मालगुंडच्या दिशेने मार्गक्रमण करायचं. छोटासा पूल ओलांडला की लगेच पाच-दहा मिनिटांमध्ये केशवसुत स्मारकांमध्ये आपण पोहोचतो. उतरल्याबरोबर नजरेत भरते ती सुंदर कमान आणि केशवसुतांचं जुनं कौलारू बैठं घर. त्यासमोर असलेलं मोठं अंगण, तुळशी वृंदावन आणि त्या बाजूला उभे असलेले लामणदिवे आणि अंगणाच्या चहुबाजूने विविध प्रकारची हिरवीगार झाडी. केशवसुतांचं घर पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो. कारण ज्या घरामध्ये केशवसुतांचं बालपण गेलं, तो नयन मनोहर परिसर कायम केशवसुतांच्या कवितेत अधोरेखित झाला आहे. वाडय़ातून बाहेर पडले की डाव्या बाजूला उभे असणारे तुतारीचे शिल्प त्यावर नजर खिळते. समोर पाहिलं की हिरव्यागार वेलींनी अच्छादलेल्या मोहक कमानी आणि त्यालगत असलेलं कमळाचं छोटसं पाण्याचं कुंड आणि समोरच्या भिंतीवर ठसठशीत अक्षरांत लिहिलेले केशवसुतांच्या कवितेतील एक सुभाषित…

‘प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा…!’ जे आमच्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या लोगोवर कायम आम्ही वाचत असतो. अनेक कवितांमध्ये केशवसुतांनी हे सांगितलेले आहे की, कवी आणि कविता यांच्यामध्ये एक अभिन्नता आहे. ही अभिन्नता तशीच राहू द्यावी. या अभिनतवाचक नातं हे मधुभाई आणि केशवसुत यांच्यामधलं असावं. यामुळेच मधुभाईंच्या मनामध्ये केशवसुतांच्या कवितेचं स्मारक व्हावं ही कल्पना आली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात साकारली. कवी केशवसुत यांना ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ असे संबोधले जाते. वर्षानुवर्षे एक विशिष्ट पद्धतीने रचलेली कविता स्वच्छंद आणि मुक्त रूपात आणणारे केशवसुत हे पहिले होते. म्हणून त्यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हटले जाते.

ही ‘मराठी काव्याची राजधानी पाहायला कविताप्रेमी पर्यटक आवर्जून जातात. म्हणून मालगुंड हे गाव प्रसिद्धीस आलं आहे.’ याबरोबरच याच ठिकाणी आजवर मराठी साहित्यामध्ये मैलाचे दगड ठरलेले कवी त्यांचे फोटो आणि त्यांच्या कविता वाचायला मिळतात. नारळी-पोफळीच्या बागेतील खुले सभागृह आणि बाजूला राहण्याची व्यवस्था असलेल्या आधुनिक रूम्स, असे हे भव्यदिव्य अलौकिक ठिकाण कोकणाच्या सौंदर्यात अधिक भर घालते आणि पर्यटकांसाठी ती पर्वणीच ठरते.

[email protected]