मतमोजणीचे ठिकाण बदलण्याविरोधात ‘माढा बंद’ला शंभर टक्के प्रतिसाद

वर्षानुवर्षे मतमोजणीचे ठिकाण असलेले माढा येथील शासकीय गोदाम हे विधानसभा निवडणुकीपूर्वीच इतरत्र हलविण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात असल्याच्या असल्याच्या पार्श्वभूमीवर माढा नगराध्यक्षा मीनल साठे यांनी ‘माढा बंद’च्या केलेल्या आवाहनाला माढ्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी,  छोट्या मोठ्या व्यापारी, भाजीपाला विक्रेते, हॉटेल व्यवसायिक, बांधकाम व्यावसायिक, सर्व शाळा, महाविद्यालयांनी शंभर टक्के बंद पाळून प्रतिसाद दिला.

यातून दवाखाने, मेडिकल व पेट्रोल पंप या अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आले. शासकीय गोदामातच यापूर्वीच्या निवडणुकांची मतमोजणी व्यवस्थित रीतीने पार पडली असतांना महसूल प्रशासनाकडून इव्हीम मशीन, व्ही व्ही पॅट, इलेक्ट्रिक ट्रान्सपरन्ट मशीन, स्कॅनरद्वारे मतमोजणी आदी आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली माढा येथील मतमोजणीचे ठिकाण बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याने माढा नागरिकांनी त्याला तीव्र विरोध करीत आज माढा बंद करण्यात आला.

महसूल प्रशासना बरोबर माढा नगराध्यक्षा, तहसीलदार, पोलीस निरीक्षक व सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्यात गुरूवारी झालेल्या बैठकीत महसूल प्रशासनाकडून जागा बदलण्याचे समाधानकारक सबळ कारण न मिळाल्याने आणि त्यावर  तोडगा निघाला नसल्याने माढा नगराध्यक्षा मीनल साठे यांनी ‘माढा बंद’चे आवाहन केले होते, त्याला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत 100 % बंद यशस्वी झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या