माढा टेम्पो कालव्यात पडला, बाप लेकीचा बुडून मृत्यू

माढा तालुक्यातील मिटकलवाडी माळेगाव रोडवर उजनीच्या डाव्या कालव्यात भरधाव वेगाने येणारा छोटा टेम्पो पडून झालेल्या अपघातात बाप लेकीचा कालव्याच्या पाण्यात बूडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना माळेगाव शिवारात रविवारी सकाळी 9 ते 10 दरम्यान घडली.

या अपघातात तात्यासाहेब बाळू कोळी (28) व त्याची सात वर्षांची मुलगी आरती तात्यासाहेब कोळी या दोघांचा कालव्यात बुडून मृत्यू झाला. तात्यासाहेब माने यांचा मिनी टेम्पो (छोटा हत्ती) भाड्याने चालवण्याचा व्यवसाय होता. नेहमीप्रमाणे ते सकाळी दुसऱ्याच्या शेतात कामासाठी महिला मजूर सोडण्याचे भाडे करून वैरण घेऊन मिटकलवाडीकडे येत होते. तेव्हा, माळेगाव शिवारात कोकाटे शेतानजीकच्या खड्यात आपटल्यामुळे गाडीचा ताबा सुटून गाडी उजनी डाव्या कालव्यात पडली.

या अपघातात बापलेकीचा पाण्यात बुडून दुर्देवी अंत झाला. दरम्यान या दुर्देवी घटनेमुळे मिटकलवाडी व परिसरातील गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पो नि राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. सई काशीद करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या