जिम ट्रेनरच्या सल्ल्याने घोड्यांचं इंजेक्शन घेतलं, सिक्स पॅक बनवण्याचा नाद तरुणाच्या अंगलट

अनेक तरुणांची व्यायामाने शरीर कमावण्याची इच्छा असते. त्यासाठी कित्येक जण जिममध्ये तासनतास घाम गाळतात. अनेक तरुणांना बॉलिवूड स्टार्सप्रमाणे सिक्स पॅक बनवून हवे असतात. अशीच इच्छा असणाऱ्या एका तरुणाला चुकीचा सल्ला मिळाल्याने त्याला रुग्णालयात दाखल व्हायची वेळ आली आहे.

हा प्रकार मध्य प्रदेशच्या इंदूर येथे घडला आहे. इंदूरच्या छोटा बांगडदा येथे राहणाऱ्या राहुल (नाव बदललेले)ने दोन महिन्यांपूर्वी शरीर कमवण्यासाठी जिममध्ये जायला सुरुवात केली होती. तिथे त्याला ट्रेनिंग देणाऱ्या प्रशिक्षकाने त्याला प्रोटीन्सचं सेवन करण्याचा सल्ला दिला. त्या सल्ल्यानुसार, राहुलने 16 नोव्हेंबर रोजी तेथील युनायटेड सर्जिकल नावाच्या केमिस्टकडून प्रोटीन, एएमपी इंजेक्शन आणि स्टेरॉईड खरेदी केलं. व्यायाम केल्यानंतर त्याने या प्रोटीनचं सेवन केलं. प्रोटीन घेतल्यानंतर काही वेळातच त्याच्या पोटात वेदना सुरू झाल्या.

तरीही त्याकडे दुर्लक्ष करून त्याने दुसऱ्या दिवशी इंजेक्शनही टोचून घेतलं. इंजेक्शन टोचल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागलं. त्यानंतर त्याला चक्कर येऊ लागली. उलट्या आणि जुलाबही सुरू झाले. जवळपास 72 तास त्याला झोप आली नाही. त्यामुळे तो आणखी अस्वस्थ झाला. त्याच्या यकृताला सूज आली. तसंच त्याची सेक्स करण्याची क्षमताही संपुष्टात आली. त्यानंतर त्याने डॉक्टरांकडे धाव घेतली. तेव्हा डॉक्टरांनी त्याच्या या त्रासाचं कारण सांगितलं.

त्यांच्या म्हणण्यानुसार, जे इंजेक्शन राहुलने घेतलं होतं, ते शर्यतीत पळणाऱ्या घोड्यांना दिलं जातं. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदार मोहित पाहुजा याला अटक केली आहे. मोहितने आपण घोडे आणि कुत्र्यांसाठी वापरण्यात येणारी इंजेक्शन्स स्वस्तात मिळत असल्याने आपण तीच विकत असल्याचं पोलिसांसमोर कबूल केलं. मोहितने राहुलशिवाय अन्य कुणाकुणाला ही इंजेक्शन्स विकली आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.