संत साहित्यिक मधुकर जोशी यांना ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार

167

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा  2018-19 चा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मधुकर रामदास जोशी यांना घोषित करण्यात आला. पाच लाख रुपये रोख, मानपत्र तसेच सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीतील  डॉ. प्रशांत सुरू, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, भास्करराव आक्हाड या सदस्यांनी ‘ज्ञानोबा-तुकाराम’ पुरस्कारासाठी मधुकर जोशी यांची निवड केली.

मधुकर जोशी यांना संत साहित्यावर विपुल लेखन केले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये ‘मराठी साहित्याचा ज्ञानकोश’चे ते संपादक आहेत. संत तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे. पीएच. डी आणि एम. फिलचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. मराठी बोर्ड ऑफ स्टडी जबलपूर, नागपूर आणि उज्जैन अभ्यास मंडळावर त्यांनी सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयाकर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते.

जोशी संत साहित्य विषयाचे पीएच. डी चे मार्गदर्शक आहेत. ‘नाथ सांप्रदाय’, ‘ज्ञानेश्वरी संशोधन’, ‘गुलाबराव महाराज समकालीन साहित्य’, ‘दत्तगुरूंचे दोन अवतार’, ‘मनोहर आम्बानगरी’, ‘श्री विठ्ठल आणि पंढरपूर’, ‘समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य’ अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली.  सध्या ते तंजावर येथील 3,500 मराठी हस्तलिखितांचे संशोधन करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या