
मायेच्या नात्याला शब्दांची गरज नसते. प्राण्यांशी मनुष्याचे असलेले नाते हे काहीसे असेच आहे. तब्बल तीन महिन्यांनी माधुरी हत्तीण माहुताला भेटली. ही भेट इतकी हृदयस्पर्शी होती की न बोलताच दोघेही एकमेकांना बरंच काही सांगत होते. ही भेट म्हणजे अबोल प्रेमाचा एका सोहळाच होता.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात माधुरी कोल्हापूरच्या नांदणी गावातून गुजरात येथील वनतारा येथे गेली. तिची आरोग्य चाचणी शुक्रवारी करण्यात आली. यावेळी माहुत इस्माईल, जैन मठाचे वकील मनोज पाटील, डॉक्टर व अन्य काही जण तेथे उपस्थित होते. तीन महिन्यांनी भेटलेल्या माहुताच्या प्रत्येक हाकेला माधुरी प्रतिसाद देत होती. त्यांच्यातील अनोखा संवाद बघून सर्वजण थक्क झाले.
गेली 25 वर्षे इस्माईल माधुरीची काळजी घेत आहे. तिला नांदणी गावाची सैर करत आहे. अचानक जुलै महिन्यात तिची गुजरातला पाठवणी झाली. तेव्हा इस्माईलचे अश्रू अनावर झाले होते. पुन्हा भेट झाल्यानंतर त्याचे डोळे पाणावले. माधुरी भारावून गेली होती. या दोघांमधील हे नाते बघून तेथील सर्वच भावुक झाले होते. या आरोग्य चाचणीत माधुरीची प्रकृती ठणठणीत असल्याचे स्पष्ट झाले. याचा अहवाल आता लवकरच उच्चाधिकार समितीकडे सादर केला जाईल. त्यानंतर माधुरीच्या घरवापसीच्या पुढील प्रक्रियादेखील सुरू होईल.
या महिन्यात सुनावणी
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माधुरीला पुन्हा नांदणी गावात आणण्यासाठी उच्चाधिकार समितीसमोर सुनावणी सुरू आहे. माधुरीची घरवापसी करण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रशासकीय परवानग्या घ्या. तिच्या आरोग्याची चाचणी करून अहवाल सादर करा, असे आदेश उच्चाधिकार समितीने दिले होते. त्यानुसार ही चाचणी झाली आहे. यावरील पुढील सुनावणी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.



























































