समोर येईल त्याला तलवारीने कापला, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यासह कुटुंबातील 6 सदस्यांनी जीव गमावला

मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यासह कुटुंबातील 6 जणांची तलवारीने भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी जो समोर येईल त्याला अक्षरशः कापून काढले. यात दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे गावात संतापाचा उद्रेक झाला असून यातील एका आरोपीला पकडून गावकऱ्यांनी त्याची हत्या केली. मांडला जिल्ह्यातील बिजादांडी पोलीस स्थानक भागात ही घटना घडली आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, सोनी कुटुंबामध्ये वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद सुरू होता. याच वादातून हे भयानक हत्याकांड घडले. हत्याकांडात मृत्यू झालेले राजेंद्र सोनी भाजपचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्यासह कुटुंबातील अन्य 5 जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यात सात आणि दहा वर्षांच्या लहान मुलांचाही समावेश आहे.

मृतांची नावे –
1. राजेंद्र सोनी (वय – 58)
2. विनोद सोनी (वय – 45)
3. ओम सोनी (वय – 10)
4. प्रियांशी सोनी (वय – 7)
5. प्रिया सोनी (वय – 28)
6. दिनेश सोनी (वय – 50)

screenshot_2020-07-16-14-43-18-522_com-android-chrome

या हत्याकांडातील दोन आरोपींपैकी एकाला गावकऱ्यांनी पकडले आणि बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. संतोष सोनी असे गावकऱ्यांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्याचे नाव असून हरी सोनी नावाच्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गावात तणावाचे वातावरण असल्याने अतिरिक्त फौजफाटा तैनात केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या