शिमगा मध्य प्रदेशात, धक्काबुक्की बंगळुरूत; काँग्रेसच्या दोघा मंत्र्यांना मारहाण झाल्याचा आरोप

1193

मध्य प्रदेशातील राजकीय वादाच्या ठिणग्या परराज्यात पडू लागल्या आहेत. राज्यातील 22 बंडखोर आमदारांच्या भेटीसाठी बंगळुरूमध्ये गेलेल्या जितू पटवारी आणि लाखन सिंह या दोघा मंत्र्यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली, असा आरोप काँग्रेसचे खासदार विवेक तन्खा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

बंगळुरूमध्ये गेलेल्या पटवारी आणि सिंह यांना कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी अटक केली. बंगळुरूच्या रिसॉर्टमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या गटाच्या आमदारांचे वास्तव्य आहे. या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी पटवारी आणि सिंह हे रिसॉर्टमध्ये गेले असता तेथे त्यांच्याशी पोलीस अधिकाऱयांनी धक्काबुक्की केली. नंतर दोन्ही मंत्र्यांना मारहाणही करण्यात आली, असे काँग्रेस खासदार विवेक तन्खा यांनी सांगितले.

काँग्रेस सुप्रीम कोर्टात जाणार

मारहाणीच्या घटने प्रकरणी आम्ही मध्य प्रदेश उच्च न्यायालयात गेलो तर ही घटना कर्नाटकात घडलेली असल्यामुळे ‘क्रॉस बॉर्डर’चा मुद्दा उपस्थित होईल. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे खासदार तन्खा यांनी सांगितले. लोकशाहीवर इतका मोठा हल्ला यापूर्वी कधीही झालेला नाही, असा दावाही त्यांनी केला.

विश्वासदर्शक ठरावावरून भाजप-काँग्रेस आमने सामने

ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपमध्ये दाखल होऊन 24 तास उलटल्यानंतर मध्य प्रदेशच्या राजकारणात नव्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. राज्यात विश्वासदर्शक ठरावावरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहे. भाजपने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी केली आहे, तर काँग्रेसने आमदारांच्या राजीनाम्याचा निर्णय झाल्याशिवाय विश्वासदर्शक ठराव मांडण्यावर आक्षेप घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या