‘पोक्सो’अंतर्गत पहिल्यांदाच मुलीला शिक्षा

मध्य प्रदेशातील इंदूर कोर्टाने एका मुलीला पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. पहिल्यांदाच पॉक्सो कायद्यानुसार एका युवतीला शिक्षा झाल्याची घटना आहे. अल्पवयीन मुलाचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप तिच्यावर होता. आरोपी युवतीचं वय 19 वर्षे आहे.

कुटुंबानुसार, आमचा मुलगा खूप दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला, परंतु कुठेच तो सापडला नाही. त्यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात धाव घेतली. बाणगंगा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या बेपत्ता मुलाचा शोध घेऊन त्याला इंदूरला परत आणले गेले. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा जबाब नोंदवला. त्यात संपूर्ण घटनेचा खुलासा झाला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी युवतीला अटक केली. हे प्रकरण कोर्टात सुनावणीसाठी होते. इंदूर विशेष न्यायाधीशांनी आरोपी युवतीला 10 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अल्पवयीन मुलाच्या शारीरिक शोषणासाठी पहिल्यांदाच कोर्टाने एका युवतीला शिक्षा सुनावल्याची ही घटना आहे.