‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा पर्दाफाश, 8 महिन्यात केली 6 लग्न; एका लग्नाचे मिळायचे 10 हजार

2044

मध्य प्रदेशमधील रतलाम जिल्ह्यातील सैलाना जवळ पोलिसांना काही दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. याचा तपास करताना पोलिसांनी ‘लुटेरी दुल्हन’ टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील तरुणीने राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशमधील तरुणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तरुणीने गेल्या 8 महिन्यात 6 लग्न केली आणि या प्रत्येक लग्नाचे तिला 10हजार रुपये मिळत असल्याचे खुलासा पोलिसांनी केल्यानंतर खळबळ उडाली.

सैलाना जवळ पोलिसांना महेंद्र मोतीलाल कलाल (वय – 29) या तरुणाचा मृतदेह आढळला होता. प्राथमिक चौकशीत तरुणाची हत्या त्याची पत्नी मीनाक्षी याने केल्याचे समोर आले. दोन दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. दोघांचे लग्न मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून झालेले होते आणि लग्नासाठी मीनाक्षी हिचा बनावट भाऊ याने अडीच लाख रुपये वर पक्षाकडून घेतले होते.

लग्नानंतर दोन दिवसांनी तिच्या टोळीतील लोक माहेरची माणसं बनून आली आणि पती-पत्नी असे दोघांना सोबत घेऊन गेले. त्याच्या पुढच्या दिवशी महेंद्र याचा मृतदेह पोलिसांना सापडतो. पोलीस तपासात मीनाक्षी इंदूर जवळील बरोली या ग्रामीण भागात असल्याचे मोबाईल लोकेशनवरून उघड होते. पोलीस या ठिकाणी पोहोचतात आणि तिला अटक करतात.

पोलीस तपासात मीनाक्षी अनेक धक्कादायक खुलासे करते. पतीला सोडल्यानंतर ती आई-वडिलांकडे राहायला आली होती. याच दरम्यान तिची भेट उत्तर प्रदेशच्या पुष्पेंद्र दुबे नावाच्या तरुणाशी होते आणि तोच महेंद्र याच्या कुटुंबाशी मीनाक्षी हिचा भाऊ बनून भेटलेला असतो.

पुष्पेंद्र लग्नाचे रॅकेट चालवत होता आणि मला एका लग्नाचे 10 हजार मिळायचे असेही तिने सांगितले. गेल्या 8 महिन्यात विविध राज्यात 6 लग्न केल्याचे तिने सांगितले. मीनाक्षी हिच्या खुलासानंतर तिच्यावर आणि मॅरेज ब्युरो संचालक मुकेश जोशी याच्यावर कलम 365 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.-

आपली प्रतिक्रिया द्या