सरकारी मदत लाटण्यासाठी नेलेल्या अर्भकाचे दोन तुकडे झाले, वाचा सविस्तर

617
प्रातिनिधिक फोटो

मजुरी करणाऱ्या महिलांना प्रसूती झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारकडून दिल्या जाणाऱ्या वेतनासाठी एका महिलेने चक्क कणकेचे बाळ तयार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेने तिची घरातच प्रसूती झाल्याचे सांगत जन्मताच बाळ दगावल्याचा कांगावा केला.

सदर महिला ही मजूर असून तिने सरकारी योजनेतून 16 हजार रुपये मिळविण्यासाठी हा सर्व बनाव रचला होता. तिने आणखी दोन महिलांच्या मदतीने कणीक भिजवून त्याचा गोळा तयार केला व त्याला नवजात बाळासारखा आकार दिला. तो कणकेचा गोळा घेऊन त्या तिघी ‘मोरेना केलारास’ इथल्या रुग्णालयात आल्या. तिथे त्यांनी सदर महिलेची घरात प्रसूती झाली असून तिचे बाळ मृत जन्माला आल्याचे नर्सला सांगितले. तसेच त्यांनी यावेळी नवजात मातांसाठी असलेल्या सरकारी योजनेसाठी नाव नोंदवायचे असल्याचेही सांगितले. त्यावेळी नर्सने तिला बाळ दाखविण्यास सांगितले. मात्र आमच्यामध्ये मेलेलं बाळ दाखवत नाही असे सांगत तिने टाळाटाळ केली. त्यामुळे नर्सने याबाबत डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी देखील तिला बाळ दाखवण्यास सांगितले. आता आपली पोलखोल होणार यामुळे घाबरलेल्या त्या महिलेच्या हातून तो कणकेचा गोळा पडला व त्याचे दोन तुकडे झाले. तो सर्व प्रकार पाहून डॉक्टर व नर्सला देखील धक्का बसला. त्यानंतर डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना कळविले. मात्र त्या महिलांनी गयावया करत माफी मागितल्याने त्यांना अटक न करता सोडण्यात आले.

मी अशा प्रकारची घटना माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी पाहिली नव्हती असे डॉ. विनोद गुप्ता यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे. या महिलांनी बाळ नुकतंच जन्मलेलं वाटावं म्हणून कणकेच्या गोळ्याला फिका लाल रंग देखील दिला होता असंही गुप्ता यांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या