तरुणीवर तीन तास सामूहिक बलात्कार, पोलिसांनी केली थट्टा

485
फोटो - प्रातिनिधिक

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्यप्रदेशातील भोपाळ शहरातील पोलीस उपनिरीक्षकाच्या मुलीवर चार नराधमांनी तीन तास बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर ही धक्कादायक घटना घडली असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीचे वडील पोलीस उपनिरीक्षक असून आई गुन्हे अन्वेषण विभागात काम करते. ही तरुणी यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत आहे. मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास क्लासवरून घरी परतत असतानाच आरोपी गोलू बिहारी चाधर याने तिचा हात पकडला. त्यावेळी तिने स्वतःची सुटका करण्यासाठी त्याला लाथ मारून ढकलून दिले. अपमान झाल्यामुळे चिडलेल्या गोलूने अमर घुंटू या साथीदाराला बोलावून घेतले. या दोघांनी तरुणीला पकडले आणि रेल्वेरुळालगतच्या नाल्याकडे नेले. तिथे तिला मारहाण करत तिला तेथून रेल्वेरुळालगतच्या पुलाखाली नेऊन तिथे तिच्यावर बलात्कार केला. तीन तास या चौघांनी तिच्यावर बलात्कार केला.

या घटनेनंतर पीडित तरुणी कशीबशी हबीबगंज रेल्वे स्थानकातील पोलीस चौकीत पोहोचली. तेथून तिने आपल्या पालकांना फोन केला आणि बोलावून घेतले. मुलीची अवस्था बघून पालकांनी तिला घरी नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तक्रार करण्यासाठी एमपी नगर पोलीस ठाण्यात गेले. आपल्या हद्दीत हा प्रकार घडला नसल्याचे सांगून पोलिसांनी त्यांना हबीबगंज पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. तेथील पोलिसांनीही त्यांनी हबीबगंज रेल्वे पोलिसांकडे जाण्यास सांगितले. तेथे तक्रार नोंदवण्यासाठी गेले असता कोणत्या चित्रपटाची गोष्ट सांगत आहात का, असा प्रश्न विचारून पोलिसांनी तरुणीची आणि पालकांची थट्टा केली. अखेर पालकांनी पोलीस उपमहानिरीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यावर त्यांनी संबंधित पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या