स्वतःच्या प्रतिमेचे वेड…

101

 दिलीप जोशी  n  [email protected]

प्रेम कुणावरही करावं’ अशी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची एक कविता आहे. माणूस प्रेमात पडतो आणि त्याच्या सुरस कहाण्या प्रसिद्ध होतात. प्रेमकाव्य, प्रेमकथा यांची रेलचेल जगभराच्या साहित्यात आहे. शिवाय प्रेम फक्त ‘तो’ आणि ‘ती’ यांचंच असतं असं नाही. कोणी एखाद्या छंदाच्या प्रेमात पडतं. कलेच्या, विज्ञानाच्या कशाच्याही ‘प्रेमात’ पडणाऱ्यांची संख्या कमी नाही. लुई पाश्चर हा वैज्ञानिक रोगजंतूंच्या संशोधनाच्या इतका ‘प्रेमात’ पडला होता की, लग्नाच्या दिवशी नवरी बोहोल्यावर येऊन उभी ठाकली तरी हे महाशय प्रयोगशाळेतच गुंतले होते असं सांगितलं जातं.

एखाद्या विषयावरची अविचल निष्ठा प्रेमासारखीच असते. तरीही आयुष्यभरात माणूस सर्वात जास्त प्रेम कुणावर करतो, या प्रश्नाचं उत्तर अनेकदा ‘स्वतःवर’ असंही येऊ शकतं. कारण आपण जे काही करतो ते आत्मसुख, आत्मसमाधानासाठीच. त्यामुळे आपण नकळत स्वतःवरचंच ‘प्रेम’ विविध माध्यमांमधून व्यक्त करत असतो. आपल्या कलागुणांचा, हुशारीचा सार्थ अभिमान ही स्वप्रेमाचीच गोष्ट असते आणि त्यात गैर काहीच नाही. शिवाय इतरांनी आपले कौतुक, सन्मान, जयजयकार केला तर बरंच वाटतं. उगाच आपलं ‘कशाला, कशाला’ म्हणत संकोच दाखवण्यामागेसुद्धा आपल्याला दाद मिळतेच याच्या आनंदाचा सुप्त भाव असतोच. मात्र त्याचं रूपांतर दुराभिमानात होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

अगदी थेटपणे आत्मप्रतिमेच्या ‘प्रेमात’ पडण्याचं वय म्हणजे तारुण्य. त्या वयातील मुलामुलींची आरशाशी दोस्ती असते. वारंवार मेकअप फक्त तरुणीच करतात असं नव्हे तर आपली ‘हटके’ हेअरस्टाइल आरशात पन्नास वेळा निरखून स्वतःवरच प्रत्येक वेळी नव्याने खूश होणाऱ्यात तरुण मुलंही असतातच. ‘आपण छान दिसतो’ हे प्रत्येकाला मनोमन पटतं. मग जग काही का म्हणेना किंवा जगाचे सौंदर्यविषयक तथाकथित निष्कर्ष काही का असेनात! तारुण्याचा कैफ कोणालाही स्वतःमध्ये गुंतवतोच. त्याची जादू वाढत्या वयाबरोबर कमी झाली तरी पांढरे केस किंवा अगदी दाढीमिशासुद्धा ‘कलप’ लावून काळे करण्याची हौस उरतेच.

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवणारी आणि केस काळे करणारी उत्पादनं भरपूर विकली जातात. आता तर टकलावर नवे केसही लावून मिळतात. ‘अजून यौवनात मी, न जून मी अजून मी’ असं सांगण्याचा मोह प्रत्येकाला कधी ना कधी होतोच. खरं तर काही माणसं उतारवयात, परिपक्व व्यक्तिमत्त्वाची झाल्यावर त्यांच्या तरुणपणापेक्षाही अधिक छान दिसतात. काही माणसं आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर छानच दिसतात. ती स्वतःवर कसं ‘प्रेम’ करतात ठाऊक नाही, पण गेल्या काही वर्षांत आपली स्वतःची ‘सुंदर’, ‘देखणी’ छबी काढण्याचं प्रमाण जगभर वाढलंय. ‘प्रत्यक्षाहूनि प्रतिमा उत्कट’ याचा साक्षात्कार झालेले अनेक आहेत. त्यांना आपण ‘फोटोजिनिक’ वाटतो.

‘सेल्फी’ नावाचा हा प्रकार तरुण वर्गाचा आवडता. मुंबईसारख्या शहरात ट्रेन, बसमध्येही वेगवेगळ्या पोझमध्ये स्वतःचेच फोटो सेलफोनवर (मोबाईलवर) घेण्याचा कार्यक्रम सर्रास चाललेला दिसतो. अगदी निःसंकोचपणे चेहऱ्यावरचे भाव बदलत दोन-चार, सहा-दहा असे स्वतःचेच फोटो काढणारी मुलं तुम्हीही पाहिली असतील. एकदा मी एकाला त्याबद्दल विचारलं तर तो हसत उत्तरला ‘मजा वाटते.’ या सेल्फीचा खेळ अनेकांसाठी घातकही ठरला आहे.

आत्मानंदात मश्गूल होण्याचा हा नवा पर्याय नवतरुणांना गवसला तो अलीकडे पण आत्मप्रतिमेच्या ‘प्रेमात’ पडणाऱ्यांचा इतिहास फार जुना आहे. नार्सिसस नावाचा ग्रीक तरुण कोणे एकेकाळी एका जलाशयापाशी गेला. तिथल्या नितळ, शांत पाण्यात त्याने डोकावून पाहिलं आणि तो आपल्याच प्रतिमेच्या इतका प्रेमात पडला की तिथून हललाच नाही. पुढे त्या जागी त्याच नावाचं (नार्सिसस किंवा नार्सिस) फूल उमललं अशी ही कथा. १५९० मध्ये कॅरॅव्हिजिओ या चित्रकाराने या नार्सिससचं सुंदर चित्र काढलं ते रोमच्या आर्ट गॅलरीत आहे. पण तो पुराणकालीन नार्सिसस आणि आताचे सेलफोन सेल्फीबहाद्दर यांच्या मधल्या काळात अमेरिकेतील बॉस्टन येथील कार्ल बेडन या ६४ वर्षीय प्राध्यापक महोदयांच्या आत्मप्रतिमेची गोष्ट आता तिशीत पोचली आहे. म्हणजे २३ फेब्रुवारी १९८७ पासून, १५ ऑक्टोबर १९९१ हा एकच दिवस वगळता कार्ल यांनी ३५ मि.मि. फिल्मवर आपला रोज फोटो काढला आहे! हे कशासाठी? तर ते गमतीने म्हणतात ‘नाहीतर मी नगण्य म्हणूनच विस्मृतीत गेलो असतो ना!’ या माणसाने दररोज आपला फोटो काढण्यासाठी जे सातत्य दाखवलं त्याविषयी त्यांचं स्वतःचं मत असं की, ‘रोज दात घासण्याइतक्या सहजतेने मी ते केलं.’ चौतिसाव्या वर्षापासूनची त्यांची दैनंदिन छबी फिल्मवर आजही नोंदली जाते. ती तुलनेने सुसंगत दिसावी म्हणून त्यांनी कधी दाढीमिशा वाढवण्याचा शौक केला नाही आणि कॅन्सरवरच्या उपचारांनी ते थोडे रोडावले तरी स्वतःचा फोटो घेण्यात खंड पडला नाही. या त्यांच्या छंदाचं कौतुक जगाने केलं. बॉस्टन, न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या आत्मछायाचित्रांचं प्रदर्शन भरलं. पहिल्या ११ हजार फोटोंत विशेष फरक जाणवला नव्हता. तो नंतर जाणवायला लागला… प्रतिमा स्वतःच बदलत चालली.

कालाय तस्मै नमः

 

आपली प्रतिक्रिया द्या