बहुमत मंगळवारीच सिद्ध करा, राज्यपालांचे कमलनाथ यांना निर्देश

1189

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना मंगळवारी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी राज्यपालांनी कमलनाथ यांना सोमवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र, सोमवारी विधानसभा सुरू झाल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांच्या एका मिनिटाच्या भाषणानंतर विधानसभा 26 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली. त्यामुळे सोमवारी विश्वासदर्शक ठरावच होऊ शकला नाही. कोरोनाच्या धास्तीमुळे विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.तसेच सोमवारी विश्वासदर्शक ठराव टळल्यानंतलर भाजपाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भाजपाकडून या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून विश्वासदर्शक ठराव लवकरात लवकर घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून मंगळवारीच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी बहुमत चाचणी टळल्यानंतर मध्य प्रदेशातील राजकीय वाद आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. तर मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून मंगळवारीच बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. मी तुम्हाला सोमवारी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले असतानाही आपण बहुमत चाचणीला सामोरे गेला नाहीत. सरकारला सभागृहात बहुमत आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा त्याचा निर्णय सभागहातच लागू शकतो असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असल्याकडे टंडन यांनी कमलनाथ यांचे लक्ष वेधले आहे. आपण बहुमत सिद्ध करण्याऐवजी तसे करण्यास असमर्थता व्यक्त केली, याचा मला खेद वाटतो असेही राज्यपालांनी पत्रात म्हणाले. बहुमत चाचणी न करण्याची कमलनाथ यांची कारणे आधारहीन आणि अर्थहीन असल्याचे नमूद करत, लोकशाहीतील मान्यतांचा सन्मान करत आपण मंगळवारी 17 मार्चलाच बहुमत सिद्ध करावे, असे आदेश राज्यपालांनी दिले आहेत. कमलनाथ सरकारने बहुमत सिद्ध केले नाही तर सरकार अल्पमतात जाणार आहे.

सोमवारी मध्य प्रदेश विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी कोरोना साथीच्या आजारामुळे विधानसभा 26 मार्चपर्यंत स्थगित केली. त्यानंतर संतापलेल्या भाजपच्या आमदारांनी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेत लवकरात लवकर बहुमत चाचणी घेण्यात यावी अशी मागणी केली. ही मागणी करण्यासह भाजपने सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. विधानसभा अध्यक्षांना येत्या 24 तासांमध्ये बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या