मफतलालच्या कामगारांचा घरासाठी लढा

16

सामना प्रतिनिधी । ठाणे

१५७ कोटी रुपयांची हक्काची देणी मिळविण्यासाठी गेली २८ वर्षे मिळालेल्या संघर्षास यश आल्यानंतर आता मफतलाल कंपनीच्या साडेतीन हजार कामगारांनी घरे मिळविण्यासाठी लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मफतलालच्या जमिनीवर हजारो झोपड्या बेकायदेशीरपणे उभ्या राहू शकतात, तर मग ज्या कंपनीत आम्ही घाम गाळला तेथे घरेदेखील मिळाली पाहिजेत, असा निर्धार कामगारांनी केला आहे.

मफतलाल कंपनीची जमीन विकून कामगारांची थकीत देणी द्यावीत, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा लढा जिंकल्याबद्दल बंबई मजदूर युनियनच्या वतीने गडकरी रंगायतनच्या हिरवळीवर कामगारांचा मेळावा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना युनियनचे सरचिटणीस संजय वढावकर यांनी सांगितले की, मफतलालच्या कामगारांना न्याय मिळाल्याचे समाधान असून आता यापुढील लढा हा त्यांच्या घरांसाठी लढला जाईल.

… आणि त्यांचे डोळे पाणावले

कामगार चळवळीच्या इतिहासातील मफतलाल वंâपनीचा लढा हा अतिशय महत्त्वाचा असून तो लढत असताना २८ वर्षांच्या प्रदीर्घ काळात सुमारे दीड हजार कामगारांचा मृत्यू झाला. मात्र त्यांच्या वारसांना हक्काची देणी मिळतील, अशी ग्वाही संजय वढावकर यांनी यावेळी दिली. यावेळी दिवंगत कामगारांची मुले, नातवंडे, पत्नी यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत होता. आपल्या वडिलांनी घेतलेल्या कष्टाला उशिरा का होईना फळ आल्याचे बघून अनेकांचे डोळे पाणावले.

आपली प्रतिक्रिया द्या