अलिबाग जिल्ह्यात माघी गणेशोस्तव जयंती उत्साहात साजरी

410

अलिबागमध्ये माघी गणेशोत्सव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी असलेल्या बल्लाळेश्वर, वरद विनायक यासह कुलाबा किल्ला, चौल,मुखरी, सिद्धिविनायक, बिर्ला गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. माघी गणेशोत्सवनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यात भक्तिमय वातावरण होते.

माघी गणेशोत्सवानिमित्त अलिबाग येथील प्रसिद्ध कुलाबा किल्ल्यातील सिद्धीविनायकाचे दर्शन घेण्यासाठी मंगळवाारी पहाटेपासून भक्तांच्या मोठ्या रांगा लागल्या होता. जिल्ह्यातील महड वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, नांदगावचा सिद्धिविनायक, साळवच्या बिर्ला मंदिर याठिकाणी गणेश दर्शनासाठी रात्री उशीरापर्यंत भक्तांची गर्दी राहणार आहे. त्यामुळे गणेश मंदिर परीसराला जत्रेचे स्वरुप आले होते. कुलाबा किल्ल्यात दरवर्षी माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. दरवर्षी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदाही कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने किल्ल्यात चोख व्यवस्था ठेवली होती. पहाटेपासून गणेशभक्तांनी किल्ल्यात गर्दी केली. ओहोटीच्या वेळेत तसेच भरती असतानाही गणेशभक्तांचा ओघ सुरुच होता. यावेळी किल्ल्यात जाण्यासाठी घोडागाड्यांसह बोटीही तैनात होत्या. माघी गणेशोत्सवानिमित्त कुलाबा किल्यात रांगोळीही काढण्यात आली होती. जिल्ह्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक, भजन, कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या