सहा तालुक्यांसाठी शिर्डीत स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय करा, जिल्हाधिकारी कार्यालयाचा शासनाला प्रस्ताव

नगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रश्न कित्येक वर्षांपासून राजकारणाच्या गर्तेत अडकला आहे. तरी आता जिह्याच्या उत्तरेकडील सहा तालुक्यांच्या सोयीसाठी शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय करावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाला पाठaविला आहे. त्यामुळे शिर्डी मुख्यालय असलेल्या नव्या जिह्याची ही पूर्वतयारी तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नगर जिल्हा क्षेत्रफळाने मोठा असून, महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा प्रस्ताव पाठविला आहे. या कार्यालयासाठी शिर्डी येथील शेती महामंडळाची जमीन उपलब्ध असल्याचेही या प्रस्तावात नमूद केले आहे. मान्यता मिळाल्यास उत्तर जिह्याच्या उत्तर भागातील संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव या सहा तालुक्यांसाठी शिर्डीत स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय होणार आहे.

नगर जिह्यात 14 तालुके असून, क्षेत्रफळ 17 हजार 49 चौ.कि.मी. आहे. जिल्हा उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागांत विभागला आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना अधिकाऱयांची दमछाक होते. जनतेचा वेळ आणि पैशांची बचत व्हावी, यासाठी काही वर्षांपासून जिल्हा विभाजनाची मागणी होत आहे. मात्र, राजकीय वादामुळे अजून विभाजनाचे घोंगडे भिजत पडले आहे.

अधिकारी-कर्मचाऱयांच्या 23 पदांची आवश्यकता

ह स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी अपर जिल्हाधिकारी 1, उपजिल्हाधिकारी 1, तहसीलदार 1, नायब तहसीलदार 1, लघुलेखक 1, अव्वल कारकून 7, महसूल सहायक 10 व वाहनचालक 1 अशी एकूण 23 पदे भरावी लागणार आहेत.

अधिपत्याखालील तालुके व गावे

ह संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव या सहा तालुक्यांतील 657 गावांचा समावेश आहे. या सहा तालुक्यांचे क्षेत्रफळ 6 हजार 132 चौ.कि.मी. असून, लोकसंख्या 20 लाख 13 हजार 149 इतकी आहे.