कारवर ‘पोलीस’, ‘विधान भवन’चा स्टिकर लावणे पडले महागात

सरकारी कर्मचारी नसतानाही खासगी कारवर पोलीस तसेच विधान भवनच्या वास्तूचा स्टिकर लावणे माझगाव येथील 21 वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले. मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने आरोपी उबेद मिस्त्री याला भादंवि कलम 171 अन्वये दोषी ठरवले आणि फसवणुकीच्या हेतूने केलेल्या कृत्याबद्दल साध्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी के. एस. झंवर यांनी हा निर्णय दिला.

आरोपी उबेद मिस्त्रीने स्वतःच्या ओम्नी कारवर पोलीस आणि विधान भवनच्या वास्तूचा स्टिकर लावल्याचे एका सजग नागरिकाने पाहिले होते. त्या नागरिकाने मिस्त्रीच्या कथित गुन्हेगारी कृत्याबद्दल मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याला माहिती दिली होती. मिस्त्रीने त्याची कार ‘हॉटेल मरीन प्लाझा’जवळ पार्क केली होती. यासंबंधित पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले व त्याआधारे गुह्याचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्याची विनंती सरकारी पक्षाने केली. यादरम्यान आरोपीने गुन्हा कबूल केल्यामुळे स्वतंत्र साक्षीदार तपासण्यात आला नाही, परंतु सरकारी पक्षाने गुन्हा यशस्वीरीत्या सिद्ध केला आहे, असे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी झंवर यांनी आरोपी मिस्त्रीला दोषी ठरवले आणि न्यायालयाचे दैनंदिन कामकाज संपेपर्यंत साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.